नागपूर : राज्यात मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी ठिकठिकणी आंदोलन पेटले आहे. यावरून विरोधक आणि सत्ताधाऱ्यांमध्ये आरोप -प्रत्यारोपाच्या फैऱ्या सुरु झाल्या आहेत. मराठा आरक्षणाबाबत उद्धव ठाकरे यांनी केंद्रीय मंत्र्यांचे राजीनामे मागितले आहेत. भारतीय जनता पक्षाचे (भाजप) प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर हल्लाबोल केला.
उद्धव ठाकरेंच्या चुकांचे परिणाम राज्याला भोगावे लागत आहे. या परिस्थतीला ते जबाबदार आहेत, त्यामुळे त्यांनी माफी मागावी, असे बावनकुळे म्हणाले. मंगळवारी नागपूर विमानतळावर पत्रकारांशी ते बोलत होते.
सर्वोच्च न्यायालयाने कोणत्या मुद्द्यांमुळे आरक्षण रद्द केले यावर भाष्य करत बावनकुळे यांनी ठाकरेंना खडेबोल सुनावले. सर्वोच्च न्यायालयात सुधारणा करता आली असती, पण उद्धव ठाकरे सरकारने तसे केले नाही. मात्र आता मराठा आरक्षणासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सातत्याने प्रयत्न करत आहेत.
मराठा आरक्षणाबाबत काल भाजपच्या कोअर कमिटीची बैठक पार पडली. एकंदरीत सरकारकडून मराठा आरक्षणासाठी, जो काही निर्णय होईल, त्याला भाजपचा पाठींबा असेल, असेही बावनकुळे म्हणाले.