नागपूर :शहारत उद्या म्हणजेच 14 जानेवारीला ‘मकर संक्रात’ सण साजरा करण्यात येणार आहे. त्यानिमित्त लागणाऱ्या वस्तू, साहित्यांनी बाजारपेठा सजल्या आहेत. मकर संक्रांती आणि पतंग असे समीकरण असल्याने बाजारात वेगवेगळय़ा आकार, रंगांचे पतंग आणि मांजे दिसू लागले आहेत.
मागील वर्षीच्या तूलनेत यंदा पतंग आणि मांज्याच्या किमतीत १० ते २० टक्क्यांची वाढ झाली आहे. तरीही नागपूरकरांनी बाजारपेठेत पतंग आणि मांजा घेण्यासाठी गर्दी केली आहे.
‘मकर संक्रांत’ वर्षातला पहिला सण. वर्षभरातील प्रमुख सणांपैकी असलेला हा सण देशभरात साजरा केला जातो. या दिवशी ‘तीळगूळ घ्या, गोड गोड बोला’ अशा शुभेच्छा देऊन एकमेकांना तिळाचे लाडू वाटले जातात. तसंच या सणानिमित्त पतंग उडविण्यालाही विशेष महत्त्व आहे.
कोणाची पतंग सर्वात भारी, कोणाची पतंग उंच आभाळात गेली, कोणाची पतंग कोणी छाटली, ही सगळी गंमतजंमत या सणानिमित्त पाहायला मिळते. नायलॉनचा मांजा बंद झाल्याने साध्या मांजाला मोठी मागणी आहे.
50 रुपयांपासून 350 रुपयांपर्यंत या मांजाची किंमत आहे, असं विक्रेत्यांनी सांगितले. त्याचबरोबर जर तुम्हाला पतंग उडवायचे असतील तर बिनधास्त उडवा, परंतु त्यासाठी नायलॉनच्या मांजाचा अजिबात वापर करू नका, जेणेकरून कोणालाही इजा होणार नाही, असे आवाहनदेखील स्थानिक प्रशासनाने केले आहे.