नागपूर : दिवाळी सण अवघ्या काही दिवसांवर असताना नागपुरात बाजारपेठा साहित्यांनी सजू लागल्या आहेत. शहरातील सीताबर्डी, इतवारी,गांधीबाग भागात विक्रेत्यांनी रंगीबेरंगी पणत्या, रांगोळी, आकाश कंदील, घरगुती सजावटीचे साहित्य विक्रीसाठी बाजारात आले आहेत. दिवाळी सणाला दिव्यांचे विशेष महत्त्व आहे. यामुळे बाजारात मातीचे, चिनी मातीचे, प्लास्टिकचे असे दिवे विक्रीसाठी आलेले आहेत. हिला, तरुणी यांची खरेदीसाठी गर्दी होत असून, वेगवेगळ्या आकाराच्या, रंगांचे आकाश कंदील खरेदीकडे ग्राहकांचा कल दिसून येत आहे.
सर्वसामान्यांच्या खिशाला फटका –
दरवर्षीच्या तुलनेत यंदा फराळही कमी प्रमाणात बनवण्यात येत आहे. भाजीपाल्यासह, डाळीचे दर चांगलेच कडाडले आहेत. यामुळे सर्वसामान्यांच्या खिशाला फटका बसत आहे.
यंदा दिवाळी सहा दिवसांची –
दिवाळीचा सण साधारणपणे 5 दिवस चालतो, ज्या दरम्यान धनत्रयोदशी, चतुर्दशी, दिवाळी, गोवर्धन पूजा आणि भाऊबीज हे सण साजरे केले जातात. यावेळची दिवाळी रविवार, 12 नोव्हेंबर रोजी साजरी होणार आहे. त्याचवेळी अमावस्या तिथी दुसऱ्या दिवशी दुपारी 2.57 पर्यंत राहील. त्यामुळे या दिवशी गोवर्धन पूजा न करता सोमवती अमावस्या साजरी केली जाईल. अशा प्रकारे 6 दिवस दिवाळीचा सण साजरा केला जाईल.