मंगाफ: कुवैतच्या मंगाफ शहरात बुधवारी (१२ जून) सकाळी एका इमारतीला भीषण आग लागल्याची माहिती समोर आली आहे. या आगीत ४३ जणांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली. तर अनेक जण जखमी झाल्याची माहिती आहे.
मृतांमध्ये १० भारतीय नागरिकांचा समावेश असून स्थानिक माध्यमांनी मृतांच्या आकडेवारी संदर्भात माहिती दिली. माहितीनुसार, बुधवारी सकाळी दक्षिण कुवैतमधील मंगाफ शहरातील एका इमारतीत आग लागली. या इमारतीत भारतासह आशियातून आलेल्या मजुरांचं वास्तव्य आहे.
या इमरातीला आग लागून येथे राहणाऱ्या ४१ मजुरांचा होरपळून मृत्यू झाला आहे. तसेच ४० जण जखमी झाले असून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
या इमारतीतल्या ज्या घरात आग लागली त्या घरात केरळमधील एक व्यक्ती वास्तव्यास होती. या इमारतीत राहणारे बहुसंख्य लोक दक्षिण भारतीय नागरिक आहेत. तसेच या आगीत मृत्यू झालेल्या १० भारतीयांपैकी पाच जण मूळचे केरळचे रहिवासी होते. या दुर्घटनेची माहिती मिळताच कुवैतचे उपपंतप्रधान फहद युसुफ अल सबा यांनी घटनास्थळी भेट दिली आणि परिस्थितीचा आढावा घेतला. तसेच त्यांनी पोलिसांना या घटनेचा तपास करण्याचे आदेश देण्यात आले आहे.