उमरेड– उमरेड एमआयडीसीतील एमएमपी इंडस्ट्रीज लिमिटेड या ॲल्युमिनियम फॉइल व पावडर बनवणाऱ्या कंपनीत शुक्रवारी सायंकाळी ६ वाजताच्या सुमारास मोठा स्फोट झाला. या दुर्घटनेत ११ कामगार गंभीर जखमी झाले असून त्यातील चौघांची प्रकृती चिंताजनक आहे. तसेच तीन कामगार अद्याप बेपत्ता आहेत.
स्फोटानंतर तात्काळ पोलिस, अग्निशमन दल व आपत्कालीन पथकांनी घटनास्थळी धाव घेतली. सर्व जखमींवर सध्या नागपूरच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात (मेडिकल) उपचार सुरू आहेत. सुरुवातीला काही जखमींना उमरेडच्या खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते, मात्र प्रकृती गंभीर असल्याने त्यांना नागपूरला हलवण्यात आले.
कंपनीत चार युनिट असून, स्फोट घडलेल्या युनिटमध्ये २२ कामगार कार्यरत होते. सायंकाळच्या शिफ्टमध्ये सुमारे १५० कामगार उपस्थित होते, त्यातील बरेचसे कामगार वेळेवर बाहेर पडल्यामुळे थोडक्यात बचावले. आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी नागपूर महापालिकेच्या लकडगंज व सक्करदरा झोनमधील दोन अग्निशमन वाहने व सात जवानांनी प्रयत्न केले.
घटनेची माहिती मिळताच जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर, पोलिस अधीक्षक हर्ष पोद्दार, अतिरिक्त पोलिस अधीक्षक रमेश धुमाळ, उपविभागीय पोलिस अधिकारी वृष्टी जैन, व ठाणेदार धनाजी जळक यांनी घटनास्थळी भेट दिली.
जखमी कामगारांची नावे पुढीलप्रमाणे –
पीयूष बाबाराव टेकाम (२१), पीयूष वासुदेव दुर्गे (२०), मनीष अमरनाथ वाघ (२०), करण भास्कर बावणे (२१), करण तुकाराम शेंडे (२०), कमलेश सुरेश ठाकरे (३०), सचिन पुरुषोत्तम मसराम (२६), नवनीत कुंभारे (२७) – सर्वजण भिवापूर तालुक्यातील रहिवासी आहेत.
कंपनीचे संचालक विनोद खंडेलवाल व मुख्य कार्यकारी अधिकारी ललित भंडारी यांच्याकडून या दुर्घटनेबाबत अद्याप प्रतिक्रिया मिळालेली नाही.
पुढील तपास पोलिस प्रशासनाकडून सुरू असून, बेपत्ता कामगारांचा शोध घेतला जात आहे.