मुंबई : मुंबईतील गोरेगावमध्ये जय भवानी या इमारतीच्या पार्किंगमध्ये भीषण आग लागल्याने खळबळ उडाली. यात आतापर्यंत ७ जणांचा होरपळून मृत्यू झाला. या घटनेवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रतिक्रिया दिली.
शिंदेंनी आगीमागील कारण सांगत मृतांच्या कुटुंबाला प्रत्येकी ५ लाख रुपयांच्या आर्थिक मदतीची घोषणा केली. तसेच जखमींच्या उपचाराचा संपूर्ण खर्च सरकार करेल, असेही जाहीर केले. आज दिल्लीत त्यांनी या घटनेबाबत प्रसार माध्यमांशी संवाद साधला.
गोरेगावमध्ये एसआरएची जय भवानी इमारत आहे. त्या इमारतीत आग लागली आहे. मी सातत्याने महापालिका आयुक्त, पोलीस अधिकारी यांच्याशी संपर्क करून माहिती घेत आहे. माहितीनुसार, इमारतीच्या पार्किंगमध्ये कागद आणि कापडाचे गठ्ठे होते. त्यामुळे आग लागली असा अंदाज वर्तविण्यात येत आहे.
ही घटना भयावह असून ज्यांचा या आगीत मृत्यू झाला आहे त्यांच्याबद्दल मी संवेदना व्यक्त करतो. मृतांच्या कुटुंबाला सरकारकडून ५ लाख रुपयांची मदत देण्याचा निर्णय घेण्यात आला. तर जखमींचा संपूर्ण उपचार सरकार करणार, असे शिंदे म्हणाले.