नागपूर : नागपूरच्या जुना भंडारा रोडवर असलेल्या इतवारी परीसरात स्टेशनरी दुकानाला बुधवारी दुपारी अचानक आग लागली. आगीने आजूबाजूची घरे आणि दुकानेही जळून खाक झाली. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाने घटनास्थळी धाव घेत आग विझविण्याचे काम सुरू केले. मात्र, अरुंद रस्त्यांमुळे आग विझवण्यासाठी अग्निशमन दलाला मोठी कसरत करावी लागली.
जुना भंडारा रोडवर असलेल्या आहुजा पेनमार्ट नावाच्या स्टेशनरी दुकानाला बुधवारी दुपारी साडेतीन वाजता आग लागल्याची माहिती अग्निशमन दलाला मिळाली. या घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाने घटनास्थळी धाव घेतली, मात्र अरुंद गल्ली असल्याने अग्निशमन दलालाही आग आटोक्यात आणण्यासाठी मोठी धडपड करावी लागली आजूबाजूची घरे आणि दुकानेही काही मिनिटांतच वेढली गेली.
आग आटोक्यात येताच शहराच्या इतर भागातून अग्निशमन दलाच्या गाड्यांना पाचारण करण्यात आले होते. शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याची प्राथमिक माहिती आहे. या आगीत अद्याप कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी या आगीत लाखो रुपयांचा माल जळून खाक झाला आहे.