नागपूर :देशभरात दिवाळी उत्सवाची धूम सुरु आहे. यापार्श्वभूमीवर धनत्रयोदशीच्या मुहूर्तावर शहरातील सराफा बाजारात प्रचंड उत्साह पाहायला मिळाला. दिवसभर शहरातील दागिन्यांच्या दुकानांमध्ये गर्दी दिसून आली.
शहरात सोन्या-चांदीची कोट्यवधींची उलाढाल झाली. धनत्रयोदशीच्या दिवशी शहरातील ज्वेलर्सनी 125 ते 150 कोटी रुपयांचा व्यवसाय केल्याची माहिती समोर आली आहे. ही उलाढाल मागील वर्षाच्या तुलनेत लक्षणीय 25 टक्क्यांनी वाढली आहे.
नागपुरात सोन्याचा भाव 61,700 रुपयांवरून 79,500 रुपये प्रति 10 ग्रॅम आणि चांदीचा भाव 72,000 रुपयांवरून 99,500 रुपये प्रति किलोवर पोहोचला असताना, ग्राहकांमध्ये उत्साह राहिला.
दरम्यान धनत्रयोदशीच्या दिवशी सोने व चांदीला मोठ्या प्रमाणात मागणी होती. व्यापाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, यंदा बाजारात मंगळसूत्र व चेन यांना जास्त मागणी होती. महाल, इतवारीतील काही दुकानांत तर ग्राहकांना रांगा लावाव्या लागल्या. ग्राहकांची होणारी गर्दी लक्षात घेता, दागिन्यांची दुकाने सकाळी ९ च्या सुमारासच उघडली व रात्री उशिरापर्यंत खरेदी-विक्री सुरूच होती.