दत्तात्रय नगर येथील रहिवास्यांनी मांडल्या समस्या : वॉक अण्ड टॉक विथ मेयर उपक्रम
नागपूर: शहरातील सर्व नागरिकांच्या समस्यांची गांभीर्याने दखल घेतली जाईल. कुणावरही अन्याय होणार नाहीत. सर्वांचे प्रश्न मार्गी लावण्यावर भर देणार असल्याचे आश्वासन महापौर संदीप जोशी यांनी दिले. शनिवारी वॉक अण्ड टॉक उपक्रमाअंतर्गत दत्तात्रयनगर येथील उद्यानात कार्यक्रम आयोजित करण्यात आला.
यावेळी महापौर संदीप जोशी यांच्यासह जलप्रदाय समिती सभापती पिंटू झलके, उपसभापती भगवान मेंढे, नगरसेविका रिता मुळे, स्नेहल बिहारे, दिव्या धुरडे, नगरसेवक दीपक चौधरी, नेहरूनगर झोन सहायक आयुक्त स्नेहा करपे, उद्यान अधीक्षक अमोल चौरपगार प्रामुख्याने उपस्थित होते.
दत्तात्रयनगर येथील उद्यानातील नागरिकांनी आपल्या समस्या महापौरांपुढे मांडल्या. हेमराल भोसकर यांनी याभागात अतिरिक्त एक उद्यान आणखी हवे यासंदर्भात मागणी केली.
वीणा बेलगे यांनी सक्करदरा तलाव स्वच्छता मोहिम लवकरात लवकर सुरू करण्याची मागणी केली. सध्यस्थितीत तलावात घाणीचे साम्राज्य निर्माण झाले असून डासांचा त्रास होत असल्याची तक्रार केली. किशोर कुंभलकर यांनी जुना सुभेदार ले आऊट येथे सिवरेज लाईन चोकअप झाल्यामुळे विहीरींना दुषित पाणी येत असल्याची तक्रार केली. अड बानाईत यांनी उद्यानातील खेळणी ना दुरूस्त अवस्थेत असल्याची तक्रार मांडली तर जयंत पडोळे यांनी उद्यानातील वॉकिंग ट्रॅक हा अरूंद आहे त्याचे रूंदीकरणाबाबत मागणी केली. महादेव वराडे व दिवाकर खानोरकर यांनी परिसरातील स्वच्छता दररोज करण्यात यावी, रस्ता नियमित झाडण्यात येत नसल्याची तक्रार केली.
याव्यतिरिक्त काही नागरिकांनी आपल्या सूचनादेखील महापौर संदीप जोशी यांच्यापुढे मांडल्या. गुंजन चौधरी यांनी प्लास्टिकमुक्त नागपूरसाठी एक विशेष मोहिम आपल्या संस्थेद्वारे सुरू करणार असल्याचे सांगितले. या मोहिमेचे महापौर संदीप जोशी यांनी कौतुक केले. धनश्री राजदेरकर यांनी उद्यानात असमाजिक तत्त्वे मोठ्या प्रमाणावर वाढत असल्यामुळे स्थानिक नागरिकांना त्याचा त्रास होत असल्याची तक्रार केली. याशिवाय उद्यानात पार्किंगची समस्या मोठ्या प्रमाणावर असल्याचे त्यांनी सांगितले. नंदकिशोर टिकले यांनी विद्युत पोल्स हे वाकले असल्यामुळे त्याचा धोका होऊ शकतो, अशी तक्रार केली. त्यावर महापौरांनी त्वरित प्रकरण निकाली काढण्याचे निर्देश दिले. याशिवाय मुकुंद बडगे, वसंत चांगदे, भास्कर राघोर्ते, ज्योती देवघरे, नामदेव फटिंग, वीजय बोरकर यांनी आपल्या समस्या महापौरांपुढे मांडल्या.
महापौर संदीप जोशी यांनी सर्व समस्या जाणून घेतल्यावर यावर लवकरात लवकर कार्यवाही करू असे निर्देश दिले. आपणही आपली तक्रार 5 डिसेंबर पूर्वी झोनल कार्यालयात तीन प्रतींमध्ये देण्याचे आवाहन केले. शहराच्या विकासात नागरिकांचाही वाटा हा तेवढाच महत्त्वाचा आहे. नागरिकांनी आपली कर्तव्ये चोखपणे बजावणे हे आवश्यक आहे. आपल्या परिसरात कुणिही घाण करणार नाही, कचरा टाकणार नाही याची काळजी आपल्याच घ्यायची आहे, असे महापौरांनी यावेळी सांगितले. आपल्या घरातील कचरा हा ओला सुका वर्गीकरण करूनच द्यावा, असे आवाहन महापौर संदीप जोशी यांनी यावेळी केले.
हार, बुके, शाल स्वीकारणार नाही
माझ्या सत्कारासाठी नागरिक हार, बुके, शाल असतात. माझ्या सत्कारासाठी हार, बुके कुणिही आणू नये. यासर्वांमध्ये पैसे घालविण्यापेक्षा सत्कारासाठी लागणारे पैसे महापौर सहायता निधीसाठी देण्याचे आवाहन महापौर संदीप जोशी यांनी केले.