नागपूर: नागपूर महानगरपालिका, नागपूर अम्युचर स्पोर्ट्स असोसिएशन, नागपूर जिल्हा बास्केटबॉल संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने सुरेंद्रनगर येथील बॉस्केटबॉल मैदानावर महापौर चषक राष्ट्रीय बास्केटबॉल स्पर्धेचे उद्धाटन करण्यात आले. यावेळी प्रमुख पाहूणे म्हणून डॉ.विलास डांगरे, कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महापौर नंदा जिचकार होत्या.
यावेळी मंचावर सत्तापक्ष नेते संदीप जोशी, क्रीडा समिती सभापती नागेश सहारे, उपसभापती प्रमोद तभाने, नगरसेवक लखन येरावार, नगरसेविका वनिता दांडेकर, शिक्षणाधिकारी संध्या मेडपल्लीवार, नागपूर अम्युचर स्पोर्ट्स असोसिएशनचे कार्याध्यक्ष शंशाक दाभोळकर, उपाध्यक्ष श्री.देव प्रामुख्याने उपस्थित होते.
यावेळी महापौर नंदा जिचकार म्हणाल्या, महापौर चषकामुळे अनेक खेळाडूंना खेळण्यास व्यासपीठ उपलब्ध झाले आहे. हार पराजय हा खेळाचा एक भाग आहे. अपयश पचविण्याची ताकद ही खेळाडूतच असते, त्यामुळे तो खेळाडू हा पुढे जात असतो. तो सातत्याने प्रयत्नरत असल्याने तो विजयी ठरतो, असे म्हणत आयोजकांचे अभिनंदन केले व खेळाडूंना शुभेच्छा दिल्या.
यावेळी उद्धाटन म्हणून डॉ.विलास डांगरे बोलताना म्हणाले, अशा प्रकारच्या स्पर्धेमुळे खेळाडू उत्साही राहतो. त्याचे उस्ताहीपण ही त्याच्या खेळण्यासाठी चांगला आहे.
कार्यक्रमाच्या प्रास्ताविकातून क्रीडा समिती सभापती नागेश सहारे यांनी आयोजनामागील भूमिका विशद केली. यावेळी महापौर नंदा जिचकार यांनी बॉल बास्केटमध्ये टाकून कार्यक्रमाचे उद्घाटन केले. कार्यक्रमाचे संचालन प्रणय घाटे यांनी केले. आभार निलेश जुमडे यांनी मानले.