नागपूर : नागपूर महानगरपालिका क्षेत्रातील सर्व दुकानदार, हॉकर्स, हातठेलेधारक, फेरीवाले तसेच इतर सर्व व्यावसायिकांना त्यांच्या आस्थापनेवर कचरा पेटी ठेवणे बंधनकारक राहील, असे आदेश निघाल्यानंतर नागपूर शहरातील दुकानदार आता आपल्या दुकानांसमोर कचरा पेट्या ठेवू लागल्याचे चित्र नागपुरात दिसत आहे.
महापौर संदीप जोशी आणि आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या आदेशानुसार नागपूर महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाने यासंदर्भात सूचना जारी केली होती. शहर स्वच्छतेच्या बाबतीतल्या नियमांची कडक अंमलबजावणी करण्यात येत आहे. महाराष्ट्र शासनाच्या अधिसूचनेतील भाग एक व अ अंतर्गत पहिल्या प्रसंगाकरिता व त्यानंतरच्या प्रत्येक प्रसंगाकरिता दंड वसूल करण्यात येणार आहे. याव्यतिरिक्त मोठ्या प्रमाणात कचरा निर्माण करणाऱ्यांकडून दंडाची मोठी रक्कम आकारण्यात येणार आहे. त्यामुळे प्रत्येक दुकानदार, हॉकर्स,हातठेलेधारक, फेरीवाले आणि इतर सर्व व्यावसायिकांनी आपल्या आस्थापनेत कचरा पेटी ठेवण्याचे आवाहन करण्यात आले होते. आस्थापनेच्या १० वर्ग फूट परिसरात अस्वच्छता आढळल्यास ही दंडात्मक कारवाई होणार आहे.
२७ जानेवारीपासून या आदेशाची अंमलबजावणी सुरू झाली. त्याच दरम्यान मनपा आयुक्तपदाचा कार्यभार तुकाराम मुंढे यांनी घेतल्यानंतर हा आदेश कडकपणे अंमलात आणण्याचे आदेश त्यांनी दिले. त्यानुसार आता नागपूर शहरातील अनेक आस्थापनांमध्ये कचरा पेट्या दिसू लागल्या आहेत. शहरातील सर्वच दुकानदारांनी, हॉकर्स आणि ठेलेधारकांनी तातडीने कचरा पेट्या ठेवाव्या आणि शहर स्वच्छ व सुंदर करण्यात हातभार लावावा, असे आवाहन करण्यात आले आहे.