नागपूर स्मार्ट सिटी तर्फे बाजारपेठेला सुरक्षित व सुंदर करण्याचा प्रयत्न
नागपूर : नागपूर स्मार्ट ॲण्ड सस्टेनेबल सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेडच्यावतीने सीताबर्डी बाजारपेठेला ‘स्ट्रीट फॉर पीपल’ घोषित करण्यात येत आहे. त्याचा शुभारंभ महापौर दयाशंकर तिवारी, मनपा आयुक्त राधाकृष्णन बी यांच्या हस्ते शुक्रवारी ३० जुलै रोजी सकाळी ७.३० वाजता व्हेरायटी चौक, सीताबर्डी येथे होणार आहे. ‘स्ट्रीट फॉर पीपल’ अंतर्गत सीताबर्डी बाजारपेठेला नवे स्वरूप प्रदान करण्याच्या प्रयत्नातून येथे खरेदीकरीता येणा-या नागरिकांना बाजार सुंदर आणि सुरक्षित करण्याकरीता उपाययोजना करण्यात येणार आहेत.
या संदर्भात नागपूर महानगरपालिका मुख्यालयातील स्मार्ट सिटीच्या सभागृहात एक बैठक पार पडली. या बैठकीत स्मार्ट सिटीच्या पर्यावरण विभागाच्या प्रभारी महाव्यवस्थापक डॉ. प्रणिता उमरेडकर यांनी सीताबर्डी हॉकर्स असोसिएशनच्या प्रतिनिधींसोबत ‘स्ट्रीट फॉर पीपल’ उपक्रमाबद्दल चर्चा केली. केंद्र शासनाच्या गृहनिर्माण व शहरी विकास मंत्रालयाच्या अंतर्गत ‘स्ट्रीट फॉर पीपल’ उपक्रम हाती घेण्यात आले आहे. या बैठकीत स्मार्ट सिटीचे सल्लागार हर्षल बोपार्डीकर, प्रोजेक्ट लीड डॉ. पराग अर्मल, हॉकर्स संघटनेचे व टाऊन वेंडिंग कमेटीचे सभासद गोपीचंद आंभोरे, रज्जाक कुरैशी, प्रमोद मिश्रा, संदीप साहू, अविनाश तिरपुडे आदी उपस्थित होते.
डॉ. प्रणिता उमरेडकर यांनी हॉकर्स संगठनेच्या पदाधिका-यांना सांगितले, की पुढील १५ दिवस स्मार्ट सिटीच्या वतीने प्रायोगिक तत्वावर व्हेरायटी चौकापासून ३०० मीटर पर्यंत ‘स्ट्रीट फॉर पीपल’ उपक्रमाची अंमलबजावणी केली जाणार आहे. यामध्ये हॉकर्सना सीताबर्डी मेन रोडच्या मध्ये बसून नियोजनबध्द पध्दतीने जागा करुन देण्यात येईल. दोन्ही बाजूने नागरिकांसाठी येण्या-जाण्याची व्यवस्था राहील. त्यांनी सांगितले, की मुख्य बाजारपेठ ‘व्हेइकल फ्री झोन’ असल्यामुळे या रस्त्यावर सर्व प्रकाराच्या वाहनांवर बंदी घालण्यात येईल. जेणेकरुन येथे येणा-या नागरिकांना सुरक्षित वातावरण प्राप्त होईल. तसेच महिलांना, ज्येष्ठ नागरिकांना ई-रिक्षाची व्यवस्था राहील. नागपूरसाठी हा नवा उपक्रम असला तरी याचा मोठ्या प्रमाणात दुकानदारांना व हॉकर्सला लाभ होईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
प्रायोगिक तत्वावर राबविण्यात येणा-या या प्रकल्पामध्ये दुकानदार, हॉकर्स व नागरिकांची प्रतिक्रिया घेतल्यानंतर पुढील उपाययोजना करण्यात येईल. या उपक्रमाचा मुख्य उद्देश नागरिकांना ‘वॉकींग फ्रेंडली’ स्ट्रीट मार्केट उपलब्ध करून देणे आहे. यामध्ये कोव्हिड – १९ नियमांचे पालन करुन बर्डी बाजारपेठेला नवीन दिशा देऊन ग्राहकांना खरेदी करण्यासाठी आकर्षित करण्याचा आहे. या चॅलेंजचा उद्देश शहरांमध्ये ‘स्ट्रीट फॉर पीपल’ ची एकीकृत संकल्पना स्टेकहोल्डर्स व नागरिकांच्या माध्यमातून तयार करण्याची आहे. ‘स्ट्रीट फॉर पीपल’ आणि ‘नेबरहुड स्ट्रीट’ संकल्पना आर्थिक व्यवस्थेला नवीन चालना प्रदान करेल तसेच सुरक्षित व बालकांसाठी सुध्दा फ्रेंडली असतील, असेही त्यांनी सांगितले.