– आठवडाभरात होणार उद्घाटन; नागरिकांना मिळणार पाणी
चंद्रपूर : शहरातील नागरिकांना शुद्ध व मुबलक पिण्याचे पाणी देण्यासाठी केंद्र शासन पुरस्कृत अमृत पाणीपुरवठा योजना चंद्रपूर शहर महानगरपालिकेमार्फत राबविण्यात येत आहे. बाबूपेठ येथील या योजनेचे काम पूर्ण झाले असून, येत्या आठवडाभरात उद्घाटन होणार आहे. महापौर राखी संजय कंचर्लावार यांच्यासह मनपा पदाधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष पाहणी केली.
गुरुवारी सकाळी महापौर राखी संजय कंचर्लावार, उपमहापौर राहुल पावडे, स्थायी समिती सभापती रवी आसवानी, सभागृह नेता संदीप आवारी यांनी बाबूपेठ येथील जुनोना चौकातील विविध भागांची पाहणी केली. यावेळी नळांची पाहणी केली असता पाणीपुरवठा सुरळीत होत असल्याचे आढळून आले.
बाबूपेठ येथे अमृत पाणीपुरवठा योजनेचे काम सुरु आहे. अनेक जागी पाईपलाईन टाकण्यात आली आहे. या पाईपलाईनद्वारे ज्या परीसरात पाणीपुरवठा केला जाणार आहे. तिथे सुरळीत पाणीपुरवठा होतो आहे अथवा नाही, पाण्याचा दबाव कसा आहे, याची माहिती महापौरांनी परिसरातल्या नागरिकांकडून घेतली.
याप्रसंगी नगरसेविका कल्पना बगुलकर, नगरसेवक श्याम कनकम, नगरसेवक नीलम आक्केवार, बंटी परचाके, शहर अभियंता महेश बारई, उप अभियंता विजय बोरीकर यांची उपस्थिती होती.