गांधीबाग उद्यानातील सहाव्या शिबिरात शेकडो नागरिकांनी केली नेत्रतपासणी
नागपूर : मोतीबिंदू असेल तर त्यावर शस्त्रक्रिया होणे अत्यावश्यक आहे. थोडा जरी उशीर झाला तर दृष्टी कायमची जाण्याची वेळ येऊ शकते. त्यामुळे आर्थिकदृष्ट्या कमकुवत घटकांमधील नागरिकांच्या मोतीबिंदूवर तात्काळ शस्त्रक्रिया व्हावी यासाठी यावर्षीपासून महात्मे नेत्रपेढीच्या सहकार्याने ‘महापौर नेत्र ज्योती योजना’ जाहीर करण्यात आली. त्याची अंमलबजावणीही सुरू झाली. शहरातील नागरिकांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन महापौर दयाशंकर तिवारी यांनी केले.
‘महापौर नेत्र ज्योती योजने’अंतर्गत नागपूर महानगरपालिका, महात्मे नेत्र पेढी आणि जिल्हा अंधत्व नियंत्रण समितीच्या वतीने रविवारी (ता. २१) प्रभाग क्र. १९ मधील गांधीबाग उद्यानात सहाव्या नेत्रतपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. शिबिराचे उद्घाटक म्हणून ते बोलत होते. शिबिराच्या उद्घाटन समारंभाला प्रमुख पाहुणे म्हणून वैद्यकीय व आरोग्य समितीचे सभापती महेश महाजन, प्रभाग १९ चे ज्येष्ठ नगरसेवक ॲड. संजयकुमार बालपांडे, नगरसेविका सरला नायक, विद्या कन्हेरे, मनपाचे अतिरिक्त सहायक आरोग्य अधिकारी डॉ. विजय जोशी, महापौर लोकसेवा प्रतिष्ठानचे महेशकुमार कुकडेजा, महात्मे नेत्रपेढीचे डॉ. अरविंद डोंगरवार, डॉ, मनकुमारी, आदर्श भैसारे, महादेव, संचिता, प्रिया आदी उपस्थित होते.
पुढे बोलताना महापौर दयाशंकर तिवारी म्हणाले, महापौर नेत्र ज्योती योजनेअंतर्गत शहरातील विविध भागात शिबिरांचे आयोजन करून नागरिकांची नेत्र तपासणी करण्यात येत आहे. आवश्यक असलेल्यांवर महात्मे नेत्र पेढीच्या माध्यमातून मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया करण्यात येत आहे. आजचे शिबिर सहावे असून २८ ऑगस्ट रोजी सेमिनरी हिल्स आणि २९ ऑगस्ट रोजी गांधीनगर येथे शिबिराचे आयोजन करण्यात येत असल्याची माहिती त्यांनी दिली. आर्थिकदृष्ट्या कमकुवत घटकातील नागरिकांनी या शिबिराचा लाभ घ्यावा, असे आवाहन यावेळी महापौरांनी केले.
शिबिरात प्रभाग क्र. १९ व लगतच्या परिसरातील शेकडो नागरिकांची नेत्र तपासणी करण्यात आली. मोतीबिंदूची शस्त्रक्रिया ज्यांच्यावर करणे आवश्यक आहे, त्यांच्यावर महात्मे नेत्रपेढी येथे शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे. नागरिकांना यावेळी आवश्यक औषधांचे वाटपही करण्यात आले. शिबिराला भाजपचे अनिल मानापुरे, अविनाश शाहू, अमोल कोल्हे, अजय गौर, प्रशांत गौर, ब्रजभूषण शुक्ला, गोकुल प्रजापती रतन श्रीवास, अनिल बावनगडे, पुनीत पोद्दार, सुनील जैन, रमाकांत गुप्ता, मंदा पाटील, आभा चंदेल, राजेश हिरुळकर, विक्की बाथो, उमेश वारजूकर, चंद्रकांत गेडाम, प्रकाश हटवार, कमलेश शर्मा, अनुप गोमासे आदी उपस्थित होते.