Published On : Tue, Apr 24th, 2018

नगरसेवकांनी मांडलेल्या पाणी प्रश्नाची महापौरांनी घेतली गंभीर दखल

Mayor Jichkar

नागपूर: नागपूर महानगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेत झालेल्या निर्णयानुसार जलप्रदाय समितीच्या माध्यमातून पाणी प्रश्नावर झोननिहाय नगरसेवकांची मते आणि त्यांच्या समस्या जाणून घेण्यासाठी मंगळवारी (ता. २४) पहिली बैठक पार पडली. या बैठकीत स्वत: महापौर नंदा जिचकार यांनी उपस्थिती लावून पाणी या गंभीर विषयावर नगरसेवकांचे समाधान केले. नगरसेवकांच्या तक्रारीनुसार ओसीडब्ल्यूच्या अधिकाऱ्यांना खडसावून नगरसेवकांशी समन्वय ठेवा आणि नगरसेवकांच्या समस्या १५ दिवसाच्या आत निकाली काढा, असे निर्देश दिले.

हनुमान नगर झोन कार्यालयात पार पडलेल्या बैठकीला महापौर नंदा जिचकार, जलप्रदाय समितीचे सभापती पिंटू झलके, उपसभापती श्रद्धा पाठक, झोन सभापती रूपाली ठाकूर, कार्यकारी अभियंता (जलप्रदाय) संजय गायकवाड, झोन सहायक आयुक्त राजू भिवगडे, ओसीडब्ल्यूचे श्री. कालरा उपस्थित होते.

Gold Rate
Friday 21 Feb. 2025
Gold 24 KT 86,300 /-
Gold 22 KT 80,300 /-
Silver / Kg 97,800 /-
Platinum 44,000 /-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

पाणी समस्येबाबत दररोज शेकडो नागरिक नगरसेवकांकडे समस्या मांडत असतात. या समस्यांचे निराकरण करण्यासाठी ओसीडब्ल्यूच्या संबंधित अधिकाऱ्यांकडे गेले की त्यांच्याकडून समाधानकारक उत्तरे मिळत नाही. समस्यांचे निराकरण केले जात नाही. एकाच प्रभागात समान पाणीपुरवठा होत नाही. त्यामुळे नागरिकांचा संपूर्ण रोष नगरसेवकांवर असतो, अशा तीव्र भावना नगरसेवकांनी महापौरांपुढे मांडल्या. नगरसेवकांच्या तीव्र भावना लक्षात घेता महापौरांनी नगरसेवकांनी मांडलेल्या प्रत्येक मोठ्या समस्यांचा जाब ओसीडब्ल्यूच्या अधिकाऱ्यांना विचारला. जर नगरसेवकांचेच समाधान होत नसेल तर सामान्य नागरिकांचे काय? असा सवाल उपस्थित केला. नागरिकांच्या भावना तीव्र होण्याआधी त्यांच्या समस्या तातडीने सोडवा, असे निर्देश महापौरांनी दिले.

जलप्रदाय समितीचे सभापती पिंटू झलके यांनीही नगरसेवकांनी मांडलेल्या प्रत्येक प्रश्नांची नोंद करून यासंदर्भात आपण स्वत: पाठपुरावा करणार असल्याचे सांगितले.

बैठकीला गलिच्छ वस्ती निर्मूलन व घरबांधणी समितीचे सभापती अभय गोटेकर, झोनचे माजी सभापती भगवान मेंढे, माजी उपमहापौर सतीश होले, नगरसेवक सर्वश्री रवींद्र भोयर, दीपक चौधरी, नरेश मानकर, संजय बुर्रेवार, नगरसेविका मंगला खेकरे, उषा पॅलट, माधुरी ठाकरे, विद्या मडावी, कल्पना कुंभलकर, माधुरी ठाकरे, उपअभियंता तारे आदी उपस्थित होते.

बैठकांचे वेळापत्रक
सभागृहाच्या निर्णयानुसार पाणी प्रश्नावर आयोजित झोननिहाय बैठकांच्या कार्यक्रमांतर्गत बुधवार २५ एप्रिल रोजी सतरंजीपुरा झोन कार्यालय, गुरुवार २६ एप्रिल रोजी आसीनगर झोन कार्यालय तर शुक्रवार २७ एप्रिल रोजी नेहरूनगर झोन कार्यालय येथे सकाळी ११ वाजता बैठकांचे आयोजन करण्यात आले आहे.

Advertisement