नागपूर : धरमपेठ झोन अंतर्गत येणाऱ्या सायंतारा सोसायटीतील नाल्याची रुंदी कमी करून एका बिल्डरद्वारे नाल्याच्या भिंतीवरच भिंत उभारली जात आहे. यामुळे नाल्याच्या एका बाजूने पावसाचे पाणी सोसायटीत शिरण्याची भीती आहे. संबंधित बिल्डरला समज देऊन ही समस्या सोडविण्यात येईल, असे आश्वासन महापौर दयाशंकर तिवारी यांनी नागरिकांना दिले.
यासंदर्भात बबन अवस्थी यांच्या नेतृत्वातील सायंतारा सोसायटीचे एक शिष्टमंडळ महापौर दयाशंकर तिवारी यांना कार्यालयात भेटले. नाला अरुंद करून त्यावर एका बिल्डरद्वारे भिंत बांधण्यात येत असल्याचे नागरिकांनी महापौरांना सांगितले. यामुळे पाऊस अधिक आल्यास नाल्यातील पाणी एका बाजूने वाहून सोसायटीत शिरेल. यामुळे बरेच नुकसान होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
समस्येचे गांभीर्य लक्षात घेता महापौरांनी शनिवारी (ता. २४) सायंतारा सोसायटीचा दौरा केला. अधिकाऱ्यांनाही पाचारण करण्यात आले. यावेळी त्यांच्यासोबत माजी महापौर माया इवनाते, सहायक आयुक्त प्रकाश वराडे उपस्थित होते. नागरिकांनी तक्रारीत नमूद केलेल्या संबंधित जागेची त्यानी पाहणी केली.
नाल्याच्या भिंतीवर कुणालाही भिंत उभारण्याची परवानगी नाही. ज्या बिल्डरने असे काम केले, त्याला तातडीने समज देण्यात यावी, अन्यथा दंडात्मक कारवाई करण्यात यावी, असे निर्देश महापौर दयाशंकर तिवारी यांनी दिले. पावसाळ्यात यामुळे मोठा धोका संभवू शकतो. असे यापुढे होऊ नये, यासाठीही अधिकाऱ्यांनी दक्ष राहावे, असे काहो आढळल्यास तातडीने कारवाई करावी, असे निर्देशही त्यांनी यावेळी दिले.