नागपूर : नागपूर महानगरपालिकेच्या क्रीडा व सांस्कृतिक विभागाद्वारे आयोजित ‘महापौर चषक’ वंदे मातरम् समूहगान स्पर्धा अंतिम टप्प्यात आली आहे. उद्या बुधवारी (ता.१४) सिव्हील लाईन्स येथील डॉ. वसंतराव देशपांडे सभागृहामध्ये स्पर्धेची अंतिम फेरी पार पडेल. सकाळी १० वाजता महापौर नंदा जिचकार यांच्या हस्ते अंतिम फेरीचे उद्घाटन होईल. यानंतर दुपारी १.३० वाजता त्यांच्या हस्ते विजेत्यांना पारितोषिके प्रदान करण्यात येतील.
‘महापौर चषक’ वंदे मातरम् समूहगान स्पर्धा शहरातील सर्व प्राथमिक, उच्च प्राथमिक, माध्यमिक शाळेतील विद्यार्थ्यांसाठी ही स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. इयत्ता ९वी ते १०वी, इयत्ता ६वी ते ८वी व इयत्ता पहिली ते पाचवी या तीन गटात स्पर्धा घेण्यात आली. झाशी राणी चौकातील विदर्भ हिंदी साहित्य संमेलनाच्या सभागृहात ९ ते १३ ऑगस्टदरम्यान तिन्ही गटातील स्पर्धेची प्राथमिक फेरी पार पडली.
स्पर्धेसाठी मनपा शाळांसह शहरातील १६० शाळांनी सहभाग नोंदविला होता. यामधून अंतिम फेरीमध्ये प्रत्येक गटातील चार शाळांची निवड करण्यात आली आहे. इयत्ता ९वी ते १०वी या गटात मॉडर्न स्कूल कोराडी, भवन्स बी.पी. विद्या मंदिर त्रिमूर्ती नगर, बी.आर.ए. मुंडले दक्षिण अंबाझरी मार्ग, बॅ. शेषराव वानखेडे विद्या निकेतन मनपा या शाळांची निवड झाली आहे. इयत्ता ६वी ते ८वी या गटात स्कूल ऑफ स्कॉलर्स अत्रे लेआऊट, साऊथ पॉईंट स्कूल ओंकार नगर, भारतीय विद्या भवन्स त्रिमूर्ती नगर, दुर्गा नगर माध्यमिक शाळा मनपा या शाळांची निवड झाली असून इयत्ता पहिली ते पाचवी या गटातील स्कूल ऑफ स्कॉलर्स बेलतरोडी, भारतीय विद्या भवन्स श्रीकृष्ण नगर, सांदीपनी स्कूल हजारीपहाड, विवेकानंद हिंदी प्राथमिक शाळा मनपा या शाळा अंतिम फेरीसाठी पात्र ठरल्या आहेत.