Published On : Thu, Feb 10th, 2022

खंडवानी टाऊन पोच रस्त्याकरिता निधी मंजुरीचे महापौरांचे निर्देश

Advertisement

ॲड.धर्मपाल मेश्राम यांच्या पुढाकाराने अधिका-यांची बैठक

नागपूर: नेहरूनगर झोन अंतर्गत मौजा वाठोडा येथील प्रभाग २६मधील खंडवानी टाऊनला जोडणाऱ्या रस्त्यासाठी निधी मंजूर करण्याबाबत महापौर दयाशंकर तिवारी यांनी मनपा प्रशासनाला निर्देश दिले.

Advertisement

मौजा वाठोडा येथील खंडवानी टाऊनला जोडणाऱ्या रस्त्याच्या निर्मितीमध्ये येणा-या अडचणी लक्षात घेता स्थानिक नगरसेवक तथा भाजपा प्रदेश सचिव ॲड.धर्मपाल मेश्राम यांच्या पुढाकारातून महापौरांनी बुधवारी (ता.९) अधिका-यांची विशेष बैठक बोलाविली. मनपा मुख्यालयातील महापौर सभागृहामध्ये ही बैठक घेण्यात आली.

बैठकीत महापौर दयाशंकर तिवारी, नगरसेवक ॲड.धर्मपाल मेश्राम, मुख्य अभियंता प्रदीप खवले, सहायक संचालक नगररचना प्रमोद गावंडे, उपअभियंता सुनील गजभिये, नेहरूनगर झोनचे प्रभारी कार्यकारी अभियंता नरेश सिंगणजोडे, कनिष्ठ अभियंता विजेंद्र सहारे, स्थानिक नागरिकांच्यावतीने राजेश संगेवार आदी उपस्थित होते.

पूर्व नागपूरचे आमदार कृष्णा खोपडे यांनी या रस्त्याच्या अनुषंगाने वेळोवेळी नगर रचना विभागाला पत्र दिले होते. त्यांनी घेतलेल्या पुढाकारामुळेच महापौरांनी रस्त्यासाठी लागणाऱ्या निधीच्या मंजुरीचे आदेश दिले. या रस्त्यामुळे प्रभागातील विश्वशांती नगर, श्रावण नगर, वैष्णोदेवी नगर या वस्त्यांना लाभ मिळणार आहे.

मंगळवारी (ता.८) प्रभाग २६च्या समस्यांच्या अनुषंगाने नगरसेवक ॲड.धर्मपाल मेश्राम यांच्या विनंतीवरून महापौरांनी विशेष बैठक घेतली होती. यावेळी खंडवानी टाऊनला जोडणाऱ्या रस्त्याच्या अडचणीची माहिती ॲड.मेश्राम यांनी महापौरांना दिली. यासंदर्भात अडचणी लक्षात घेऊन सविस्तर चर्चा करण्यासंदर्भात महापौरांनी संबंधित अधिका-यांची बुधवारी बैठक घेउन त्यावर चर्चा केली. नागरिकांच्या सुविधेच्या दृष्टीने सदर रस्त्याचे काम होणे आवश्यक असून यासाठी निधी मंजूर करण्याचे निर्देश महापौर दयाशंकर तिवारी यांनी यावेळी दिले.