मुंबई : बीड जिल्ह्याच्या केज तालुक्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील सर्व आरोपींवर आता मकोका लावण्यात आला आहे. काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याबाबत संकेत दिले होते आरोपी प्रतीक घुले, सुदर्शन घुले, कृष्णा आंधळे, सुधीर सांगळे, जयराम चाटे आणि महेश केदार यांची गुन्हेगारी पार्श्वभूमी आहे. तर हत्या प्रकरणात सिद्धार्थ सोनवणेलाही आरोपी करण्यात आले.
९ डिसेंबरला बीडच्या मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची हत्या करण्यात आली. संतोष देशमुख यांना अत्यंत क्रूर पद्धतीने ठार करण्यात आले होते. या प्रकरणी आरोपींना कठोर शिक्षा झाली पाहिजे यासाठी भाजपा आमदार सुरेश धस यांच्यासह विरोधकांनी रान पेठवले.
याप्रकरणी धस यांनी राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे यांच्यावर आरोप करत त्यांच्या जवळचे मानले जाणारे वाल्मिकी कराड हे या प्रकरणातील मुख्य आरोपी असल्याचा आरोप केला. पुण्यातील सीआयडी ऑफिस मध्ये जाऊन कराड यांनी आत्मसमर्पण केले होते. कराडवर फक्त खंडणीचा गुन्हा दाखल झालेला आहे. त्यामुळे त्याला मकोकाच्या बाहेर ठेवले गेले आहे. तसेच कृष्णा आंधळे हा आरोपीही अद्याप फरार असून त्याला अटक करण्यात पोलिसांना यश आलेले नाही.
मुख्य आरोपी सुदर्शन घुलेवर दहा वर्षांत दहा गुन्हे-
सरपंच देशमुख हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी सुदर्शन घुलेवर दहा वर्षात दहा गुन्हे दाखल आहेत. धारूर पोलिस ठाण्यात घुलेवर खुनाचा प्रयत्न केल्याचा गंभीर गुन्ह्यांची नोंद आहे. केज पोलिस ठाण्यात एकूण आठ गुन्हे असून मारहाणीचे चार, चोरीचा एक, अपहरणाचा एक तर २०१९ मध्ये खंडणीचा एक गुन्हा आहे. अंबाजोगाई शहरात फूस लावून पळवण्याचा गुन्हा नोंद आहे.
महेश केदार ५ गुन्हे-
महेश सखाराम केदार याच्यावर धारूर पोलिस ठाण्यात एकूण पाच गुन्हे असून त्यात मारामारी, चोरी दुखापत करणे तर २०२३ मध्ये खुनाचा प्रयत्न करणे, असे गुन्हे आहेत. त्याबरोबरच सरपंच देशमुख हत्या प्रकरणात सहभागाचा त्याच्यावर गुन्हा दाखल असून तो सध्या पोलिस कोठडीत आहे.
जयराम चाटे ३ गुन्हे-
जयराम माणिक चाटे हा २१ वर्षाचा असून त्याच्यावर २०२२ ते २४ या तीन वर्षात तीन गुन्हे दाखल आहेत. धारूर पोलिस ठाण्यात खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी एक गुन्हा, केज पोलिस ठाण्यात दुखापतीचा एक गुन्हा, तर सरपंच देशमुख हत्या प्रकरणात सहभागी असून सध्या तो पोलिस कोठडीत आहे.
प्रतिक घुले ५ गुन्हे-
प्रतिक भीमराव घुले हा २४ वर्षाचा तरुण असून त्याच्यावर २०१७ ते २४ या आठ वर्षांमध्ये केज पोलीस ठाण्यात एकूण पाच गुन्हे दाखल आहेत. त्यात मारहाण करणे, दुखापत करणे, गर्दी मारामारीत सहभाग आणि संतोष देशमुख यांच्या खुनात सहभाग असून तो सध्या पोलिस कोठडीत आहे.
कृष्णा आंधळे ६ गुन्हे-
या प्रकरणातील आरोपी कृष्णा शामराव आंधळे हा अद्याप फरार असून २०२० ते २४ या चार वर्षात एकूण सहा गुन्हे दाखल आहेत. धारूर पोलीस ठाण्यात गर्दी जमवणे, मारामारीचे तीन गुन्हे तर २०२३ मध्ये खुनाचा प्रयत्न केल्याचा एक गुन्हा दाखल आहे. शिवाय अंबाजोगाई शहर पोलिस ठाण्यात २०२३ मध्ये खंडणीचा एक गुन्हा तर केज ठाण्यात २०२४ मध्ये संतोष देशमुख यांच्या खुनात आरोपी असून तो सध्या फरार आहे.
सुधीर सांगळे १ गुन्हा-
तर सुधीर सांगळे हा देशमुख हत्या प्रकरणात खुनाच्या गुन्ह्यात सहभागी असून त्याच्यावर देखील गुन्हा दाखल आहे. सध्या तो पोलीस कोठडीत आहे.