महापौरांच्या हस्ते मशीनचे लोकार्पण : रात्रीच्या वेळी होणार प्रमुख मार्गांची स्वच्छता
नागपूर : नागपूर शहरातील प्रमुख रस्त्यांसह, रिंग रोड, अंतर्गत रस्त्यांच्या स्वच्छतेसाठी नागपूर महानगरपालिकेमध्ये मेकॅनिकल रोड स्विपींग मशीन उपलब्ध झालेली आहे. केंद्र शासनाच्या राष्ट्रीय स्वच्छ वायू कार्यक्रमांतर्गत मनपाला दोन मशीन प्राप्त झालेल्या आहेत. या दोन्ही मशीनचे गुरूवारी (ता.३) रात्री व्हेरॉयटी चौकात राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या पुतळ्यासमोर महापौर दयाशंकर तिवारी यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले.
याप्रसंगी उपमहापौर मनीषा धावडे, सत्तापक्ष नेता अविनाश ठाकरे, विरोधी पक्षनेता तानाजी वनवे, अतिरिक्त आयुक्त राम जोशी, वैद्यकीय आरोग्य समिती समिती सभापती महेश (संजय) महाजन, धरमपेठ झोन सभापती सुनील हिरणवार, ज्येष्ठ नगरसेवक सुनील अग्रवाल, ज्येष्ठ नगरसेविका प्रगती पाटील, वर्षा ठाकरे, नगरसेविका रूपा रॉय, डॉ. परिणिता फुके, उज्ज्वला शर्मा, सहायक आयुक्त प्रकाश वराडे, घनकचरा व्यवस्थापन विभागाचे नोडल अधिकारी डॉ. गजेंद्र महल्ले उपस्थित होते.
महापौर दयाशंकर तिवारी यांनी दोन्ही मशीनचे पूजन करून येथील चालकांचा सत्कार केला. मेकॅनिकल रोड स्विपींग मशीन हे नागपूर शहरातील रस्ते स्वच्छतेच्या दृष्टीने मोठे पाउल आहे. शहरातील अनेक रस्त्यांवर, दुभाजकाच्या कडेला माती व कचरा जमा असतो त्यामुळे वाहतुकीस अडचण होते. या मशीनमुळे हे रस्ते पुर्णत: स्वच्छ होतील. मेकॅनिकल रोड स्विपींग मशीनद्वारे मुख्यत: रात्रीच स्वच्छता कार्य होणार असल्याने रस्त्यांवरील वाहतुकीस अडथळा निर्माण न होता सहजरित्या स्वच्छता कार्य होईल. शहर स्वच्छतेच्या दृष्टीने हे एक महत्वाचे पाउल असून नागपूर शहरातील रस्ते स्वच्छता कार्यात यामुळे मोठा लाभ मिळणार आहे, असे प्रतिपादन यावेळी महापौर दयाशंकर तिवारी यांनी केले.
प्रारंभी डॉ. गजेंद्र महल्ले यांनी मेकॅनिकल रोड स्विपींग मशीनबद्दल सविस्तर माहिती दिली. राष्ट्रीय स्वच्छ वायू कार्यक्रमांतर्गत केंद्र शासनाच्या निधीमधून ४५ लक्ष रुपये प्रति मशीन या दराने नागपूर महानगरपालिकेद्वारे दोन मेकॅनिकल रोड स्विपींग मशीन खरेदी करण्यात आलेल्या आहेत. मेकॅनिकल रोड स्विपर हे ट्रकवर बसविलेले मशीन आहे. याची इंजिनक्षमता ५००५ सीसी असून हे मशीन दोन्ही बाजूचे ब्रश आणि मध्य भागातील ब्रशच्या सहाय्याने रस्ता स्वच्छतेचे कार्य करते. मध्य भागातील ब्रशची लांबी १५०० एमएम तर दोन्ही बाजूच्या ब्रशचे व्यास ६०० एमएम एवढी आहे. सदर मशीन रोड वरील धूळ झाडून ती मध्य भागातील ब्रश मधील व्हॅक्यूम पाईपच्या सहाय्याने कंटेनरमध्ये जमा होते. सदर कंटेनर ची धूळ साचविणायची क्षमता ६.५ क्युबिक मीटर आहे. सदर मशीन द्वारे एक तासात १० ते १२ किलोमीटर प्रतितास वेगाने रस्ते झाडणे शक्य आहे. एका मशीनद्वारे साधारणत: साडेतीन मीटर रस्ता एकावेळी साफ होउ शकतो. या मशीनद्वारे केवळ डिव्हायडर असलेले रस्तेच साफ करण्याचे नियोजन आहे. शहरातील प्रमुख मार्गांवरील, बाजारातील, महत्वाचे इतर रस्ते आठवड्यातून किमान दोनदा स्वच्छ होतील, असे नियोजन करण्यात येणार आहे. रस्त्यासह रस्ता दुभाजक, फुटपाथ आदी सर्व या मशीनद्वारे स्वछ केले जाणार आहे. मशीनच्या मागील बाजूस हाय सक्शन पम्प बसविण्यात आले आहे. यामुळे कच-याचा मोठा ढिगारा, नारळ आदी सर्व शोषून ते मशीनमध्ये जमा होईल, त्यानंतर त्याची विल्हेवाट लावली जाईल, असेही डॉ.गजेंद्र महल्ले यांनी सांगितले.