नागपूर: नागपूर महानगरपालिकेचे सत्तापक्ष नेते संदीप जोशी यांच्या वाढदिवसानिमित्त मेडिकल चौक ते सोनेगाव या शहर बस सेवेचा शुभारंभ रविवार दिनांक २० ऑगस्टला खामला चौकातील ऑरेंज सिटी हॉस्पीटल जवळ आयोजित कार्यक्रमात झाला.
सत्तापक्ष नेते संदीप जोशी, परिवहन समिती सभापती जितेंद्र (बंटी) कुकडे यांनी बसला हिरवी झेंडी दाखविली. याप्रसंगी कर व कर आकारणी समिती सभापती अविनाश ठाकरे, शिक्षण समिती सभापती दिलीप दिवे, विधी समिती सभापती मिनाक्षी तेलगोटे, क्रीडा समिती उपसभापती प्रमोद तभाने, धंतोली झोनचे सभापती प्रमोद चिखले, नगरसेविका लता काडगाये, भाजपाचे राजु हडप प्रामुख्याने उपस्थित होते.
नागपूर महानगरपालिकेच्या परिवहन समितीद्वारे ‘आपली बस’ च्या उपक्रमाअंतर्गत शहरातील विविध मार्गावर बसेस सुरू करण्यात आल्या आहेत. मेडिकल चौक ते सोनगाव या मार्गावरील बसची मागणी मागील काही महिन्यांपासून नागरिक करीत होते. त्यासाठी परिवहन समिती सभापती बंटी कुकडे यांनी पुढाकार घेत ही बस सुरू केली. ही बस नागरिकांसाठी नक्कीच फायदेशीर ठरेल असा विश्वास परिवहन समिती सभापती बंटी कुकडे यांनी व्यक्त केला आहे.
ही बस मेडिकल चौक येथून निघून टीबी वार्ड, अजनी, चुना भट्टी, देव नगर मार्गे, एलआयसी कॉलनी, खामला चौक, सहकार नगर मार्गे एचबी इस्टेट, सोनगाव अशी धावेल. ही बस सकाळी ६ वाजेपासून ते रात्री १० वाजेपर्यंत नागरिकांच्या सेवेत राहणार असल्याची माहिती परिवहन व्यवस्थापक शिवाजी जगताप यांनी दिली आहे.
कार्यक्रमाला परिवहन विभागाचे अधिकारी व कर्मचारी तसेच भाजपाचे श्रीपाद बोरीकर, आशीष पाठक, शेखर डोर्लिकर यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.