नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या अध्यक्षतेखाली आज विरोधी पक्षनेते राहुल गांधींसह सर्व केंद्रीय मंत्र्यांची बैठक होणार आहे. त्यामुळे या बैठकीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. या बैठकीत नवीन मुख्य निव़डणूक आयुक्तांच्या नियुक्तीसाठी आलेल्या उमेदवारांच्या नावावर चर्चा होणार आहे. या बैठकीला केंद्रीय कायदा मंत्री अर्जुन मेघवाल उपस्थित राहण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी २०२२ मध्ये पदभार स्वीकारला होता. त्यांच्या नेतृत्वाखाली निवडणूक आयोगानं २०२४ मध्ये लोकसभा निवडणुकीव्यतिरिक्त अनेक राज्यांमध्ये विधानसभा निवडणुका घेतल्या आहेत. यामध्ये जम्मू आणि काश्मीर, महाराष्ट्र, हरियाणा, कर्नाटक, तेलंगणा, मध्य प्रदेश, झारखंड या राज्यांच्या निवडणुकांचा समावेश आहे. तसेच यावर्षी झालेल्या दिल्ली विधानसभा निवडणुकांचा समावेश आहे. त्यांच्या कार्यकाळात निवडणूक आयोगाकडून पक्षपातीपणा केला जात असल्याचे विरोधी पक्षांनी वारंवार आरोप केले आहेत. हे आरोप निवडणूक आयोगानं फेटाळून लावले आहेत.
ज्ञानेश कुमार यांची निवड होणार?
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार मुख्य निवडणूक आयुक्तपदाच्या शर्यतीत ज्ञानेश कुमार यांचे नाव आघाडीवर आहे. पंतप्रधानांच्या अध्यक्षतेखालील निवड समिती ही नवीन मुख्य निवडणूक आयुक्तांची निवड करणार का? विद्यमान निवडणूक आयुक्तांपैकी एकाची या पदावर नियुक्ती करण्यात येणार? हे लवकरच स्पष्ट होणार आहे.