महापौर संदीप जोशी यांचा पुढाकार : संभ्रम दूर होणार!
नागपूर : लॉकडाऊनसंदर्भात गेल्या काही दिवस सुरू असलेल्या आणि यामुळे जनतेमध्ये पसरलेले संभ्रमाचे वातावरण दूर करण्यासाठी महापौर संदीप जोशी यांनी पुढाकार घेतला आहे. शुक्रवार २४ जुलै रोजी लोकप्रतिनिधी आणि अधिकाऱ्यांची बैठक बोलावली असून यात संबंधित विषयावर सांगोपांग चर्चा होणार आहे.
बैठकीला शहरातील खासदार, सर्व आमदार, मनपातील पदाधिकारी, पोलिस आयुक्त, मनपा आयुक्त उपस्थित राहणार आहेत. सदर बैठक दुपारी १२ वाजता मनपा मुख्यालय असलेल्या श्री छत्रपती शिवाजी महाराज प्रशासकीय इमारतीतील सभागृहात होईल.
यासंदर्भात महापौर संदीप जोशी यांनी संबंधित सर्वांना बैठकीचे पत्र पाठविले आहे. या पत्रात नमूद केल्यानुसार, गेल्या तीन-चार दिवसांपासून शहरात लॉकडाऊन संदर्भात चर्चा सुरू आहे. मनपा आयुक्तांनी लॉकडाऊन नव्हे तर कर्फ्यु लावला जाईल आणि तो ही १५ दिवस राहील, असे वक्तव्य केले आहे.
जर असे झाले तर सामान्य जनतेचे कंबरडे मोडले जाईल. त्यामुळे असे न करता शिस्तीचे पालन करून काही कठोर उपाययोजना करता येईल का, ज्यामध्ये जनप्रतिनिधींचाही सहभाग राहू शकेल व आपण सारे मिळून लॉकडाऊन न लावता नागपूर शहरातील सर्व जनप्रतिनिधींना सोबत घेऊन कोरोना महामारीवर विराम लावू शकू, अशी भूमिका मांडली आहे. सर्वानी एकत्रित निर्णय घेऊन जनतेमधील संभ्रम यानिमित्ताने दूर करू, असे त्यांनी म्हटले आहे.