सातारा : शेतीवरची संकटे दूर करण्यासाठी नवीन तंत्रज्ञान शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत पोहोचवावे लागेल. मातीशी तुटलेले नाते पुन्हा निर्माण करावे लागेल. केंद्र सरकारची फूड पार्कची योजना अत्यंत प्रभावी असून मेगा फूड पार्कच्या माध्यमातून कृषी क्षेत्रात नवी अर्थव्यवस्था निर्माण होईल, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज व्यक्त केला.
देगाव-सातारा एमआयडीसीमध्ये सातारा मेगा फूड पार्कचे उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाले, त्यावेळी ते बोलत होते. यावेळी केंद्रीय अन्नप्रक्रिया मंत्री हरसिमरत कौर बादल, माजी केंद्रीय मंत्री खासदार शरद पवार, खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले, खासदार संजय पाटील, आमदार श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले, आमदार शशिकांत शिंदे, विभागीय आयुक्त चंद्रकांत दळवी, जिल्हाधिकारी श्वेता सिंघल, मुख्य कार्यकारी अधिकारी कैलास शिंदे, सातारा मेगा फूड पार्कचे प्रवर्तक हणमंतराव गायकवाड, उपाध्यक्ष विजयकुमार चोले, उमेश माने आदी उपस्थित होते.
मुख्यमंत्री म्हणाले, रासायनिक खतांच्या अती वापरामुळे आपला शेतीशी असणारा संवाद तुटत चालला आहे. जैविक व नॅनो तंत्रज्ञानाच्या वापरामुळे हा संवाद सुरू होवू शकतो. त्यासाठी शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत नवे तंत्रज्ञान पोहोचविण्याची आवश्यकता आहे. शेतीमालाच्या असमतोल उत्पन्नामुळे शेतकऱ्यांच्या मालाला योग्य भाव मिळत नाही. शेतकरी आणि बाजारपेठ यामध्ये असणाऱ्या दरीचा फायदा समाजातील काही घटक घेत असतात. या घटकांना आळा घालण्यासाठी फूड पार्क हा महत्वाचा भाग ठरणार आहे. शेतीच्या उत्पन्नाला शाश्वत करण्यासाठी फूड पार्क हा महत्वाचा घटक आहे. केंद्राच्या फूड पार्कची योजना अत्यंत महत्वाची असून ती जलद गतीने विस्तारत आहे. केंद्राच्या अन्न प्रक्रिया धोरणाला सुसंगत असेच राज्याने धोरण तयार केले आहे. त्याचा फायदा राज्यातील शेतकऱ्यांना होत आहे.
देशातील सर्वाधिक ५४ कोल्ड स्टोरेजची साखळी महाराष्ट्रात तयार करण्यात आली आहे. राज्य सरकार कोल्ड स्टोरेजला कमी दरात वीज उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्नशील आहे. राज्यात सौर उर्जेवर कोल्ड स्टोरेज नेण्यासाठी राज्य सरकार प्रोत्साहन देणार आहे. राज्यातील शेतकऱ्यांना मुबलक आणि अखंडित वीज देण्यासाठी शेतकऱ्यांचे वीज फिडर सौर उर्जेवर टाकण्याचे काम सुरू आहे, त्याचा फायदा शेतकऱ्यांना होणार आहे. शेतीच्या क्षेत्रात बीव्हीजी कंपनीने मोठे काम केले आहे. बीव्हीजी कंपनीने निती आयोगाच्या समोर याविषयी केलेले सादरीकरण अत्यंत प्रभावी होते. त्यांच्या माध्यमातून शेतकऱ्यांनी केलेली शाश्वत शेतीतील यशोगाथा सर्वांसाठी प्रेरणादायी असल्याचे त्यांनी सांगितले.
शेतीच्या क्षेत्रात फूड पार्कच्या माध्यमातून नवी क्रांती होणार आहे. शेतीचा शाश्वत विकास करण्यासाठी फूड पार्कची मोठी आवश्यकता आहे. येत्या काळात त्याची आवश्यकता भासणार असून त्यामध्ये महाराष्ट्रच अग्रेसर राहील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
श्रीमती बादल म्हणाल्या, परिसरातील शेतकऱ्यांचे उत्पन्न दुपटीने वाढवण्यासाठी फूड पार्क महत्वाची भूमिका बजावणार आहे. या फूड पार्कमुळे पाच हजार लोकांना रोजगार मिळणार असून २५ हजार शेतकऱ्यांना प्रत्यक्ष व अप्रत्यक्षपणे फायदा होणार आहे. केंद्र सरकार शेतकऱ्यांना आर्थिकदृष्ट्या मजबूत बनवत आहे. शेतकऱ्यांनी अशा उपक्रमांचा फायदा घ्यावा. फूड पार्क हा मेक इन इंडियासाठी महत्त्वाचा उपक्रम आहे. दूध आणि फळांच्या उत्पादनात महाराष्ट्र देशात अग्रेसर असल्याचे गौरवोद्गारही त्यांनी काढले.
श्री.पवार म्हणाले, शेतकऱ्यांचा माल ग्राहकांपर्यंत जाईपर्यंत त्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान होते. त्यामुळे शेतमालावर प्रक्रिया करून त्याचा योग्य मोबदला शेतकऱ्यांना मिळवून देण्याची संकल्पना या फूड पार्कची आहे. महाराष्ट्रातील पहिला फूड पार्क साताऱ्यात बनला याचा आनंद असल्याचे त्यांनी सांगितले.
प्रास्ताविकात हणमंतराव गायकवाड म्हणाले, फूड इंडस्ट्री ही देशातील सर्वात वेगाने वाढणारी इंडस्ट्री आहे. सातारा फूड पार्कचे ठिकाण हे मध्यवर्ती ठिकाणी असल्याने या भागात उत्पादित होणाऱ्या स्ट्रॉबेरी, डाळींब, फणस यासारख्या फळ भाज्यांवर प्रक्रिया करून ते निर्यात करण्यात येणार आहे.
यावेळी राजूकाका भोसले, अजित इंगळे, जालिंदर सोळसकर, मारूती देशमुख, सुनिल जगताप, महेश साबळे,नागेश अंबेगावे, विश्वनाथ इंगळे, अमर चेरे, शाम पाटील, सुरेश बाटे, संजय कांचन या राज्यातील विविध भागातील शेतकऱ्यांचा सत्कार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. तसेच कृषी तंत्रज्ञान पुस्तकाच्या मराठी व हिंदी नवीन आवृत्त्यांचे प्रकाशन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आले. आभार उमेश माने यांनी मानले.
मुख्यमंत्री आणि केंद्रीय अन्न प्रक्रिया मंत्री यांनी केले फळ प्रक्रिया केंद्राचे उद्घाटन
सातारा मेगा फूड पार्कमधील बीव्हीजी ग्रुपच्या फळ प्रक्रिया केंद्राचे उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व केंद्रीय अन्न प्रक्रिया मंत्री हरसिमरत कौर बादल यांनी केले. त्यानंतर शीतगृह प्रक्रिया, पॅकींग युनिट, मसाला प्रक्रिया केंद्र आणि दाळ प्रक्रिया केंद्राची पाहणी केली. यावेळी त्यांच्या समवेत खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले, खासदार संजय पाटील, जिल्हाधिकारी श्वेता सिंघल, मुख्य कार्यकारी अधिकारी कैलास शिंदे, बीव्हीजी ग्रुपचे चेअरमन हणमंतराव गायकवाड आदी मान्यवर उपस्थित होते.