मुंबई : पंजाब नॅशनल बँकेतील (PNB Scam) अब्जावधींच्या आर्थिक घोटाळ्याचा केंद्रस्थानी असलेला आणि गेल्या अनेक वर्षांपासून फरार असलेला हिरे व्यापारी मेहुल चोक्सी (Mehul Choksi) याला अखेर बेल्जियम पोलिसांनी अटक केली आहे.
इकॉनॉमिक टाईम्सच्या रिपोर्टनुसार, केंद्रीय अन्वेषण ब्युरो (CBI) च्या विनंतीवरून 65 वर्षीय चोक्सीला 12 एप्रिल 2025 रोजी अटक करण्यात आली असून सध्या तो बेल्जियमच्या तुरुंगात आहे. अनेक वर्षांपासून तो अँटवर्प शहरात पत्नी प्रीती चोक्सीसह वास्तव्यास होता.
मुंबई न्यायालयाच्या वॉरंटवर कारवाई-
बेल्जियम पोलिसांनी अटक करताना मुंबई न्यायालयाकडून 2018 आणि 2021 मध्ये जारी करण्यात आलेल्या दोन अटक वॉरंटचा हवाला दिला आहे. तपास यंत्रणांच्या माहितीनुसार चोक्सीने तब्बल 13,850 कोटी रुपयांचा आर्थिक गैरव्यवहार केला आहे. या प्रकरणात त्याच्यावर CBI आणि ED दोन्ही एजन्सींनी कारवाई केली असून तो 2018 पासून फरार आहे.
चोक्सीच्या प्रकृतीची आडवा घेत जामिनासाठी प्रयत्न?
सूत्रांच्या माहितीनुसार, अटकेनंतर चोक्सीच्या वकिलांनी त्याच्या आरोग्याचा मुद्दा उपस्थित करत तात्काळ जामिनासाठी अर्ज दाखल करण्याची शक्यता वर्तवली जात आहे. मात्र, न्यायालयीन प्रक्रिया आणि प्रत्यार्पणाची शक्यता अजूनही शाबूत आहे.
प्रत्यार्पण आणि मालमत्ता जप्तीची कारवाई वेगात-
ईडीने यापूर्वी चोक्सीशी संबंधित 2,565 कोटी रुपयांच्या मालमत्तांवर जप्तीची कारवाई केली होती. पीएमएलए कोर्टाने या मालमत्तांचा लिलाव करण्यास परवानगी दिली आहे, जेणेकरून बँकांना आर्थिक नुकसानाची भरपाई करता येईल. तसेच, नीरव मोदी या प्रकरणातील दुसरा आरोपी अजूनही लंडनमध्ये असून त्याच्या प्रत्यार्पणाची प्रक्रीया सुरू आहे.