नागपूर: प्रदर्शनीच्या माध्यमातून नागरिकांना नागपूर मेट्रो प्रकल्पात आजपर्यंत झालेल्या अद्भुत कार्याची माहिती मिळावी याउद्देशाने आकर्षक ग्यालरी महा मेट्रोतर्फे तयार करण्यात आली आहे. वर्धा मार्गवरील नागपूर मेट्रोच्या एयरपोर्ट साऊथ स्टेशनवर ही प्रदर्शनी लावण्यात आले आहे. गुरुवारी (दिनांक ०७ मार्च २०१९) प्रदर्शनाला सुरवात होणार आहे. संपूर्ण आठवडा सकाळी ९ वाजता पासून ते सायंकाळी ९ वाजेपर्यंत ही प्रदर्शनी नागरिकांसाठी सुरु राहील. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याहस्ते २१ ऑगस्ट २०१४ रोजी नागपूर मेट्रो प्रकल्पाचे भूमिपूजन झाल्यानंतर ३१ मे २०१५ रोजी प्रकल्पाच्या कार्याला सुरवात झाली. यानंतर अवघ्या ४ वर्षाच्या अल्पकालावधीत मेट्रोची प्रवासी सेवा सुरु करण्यासाठी कश्या प्रकारे महा मेट्रोने कार्य केले, याचा संपूर्ण तपशीत प्रदर्शनीत सादर करण्यात आला आहे. नागपूरकरांनाच नाहीतर देशभरातून येणाऱ्या नागरिकांसाठी देखील ही प्रदर्शनी आकर्षणाचे केंद्र ठरणार आहे.
प्रदर्शनीत भूमिपूजन, स्टेशन मॅप, स्टेशनची माहिती, पायाभूत आणि अत्याधुनिक बांधकाम, स्टेशनच्या भव्य इमारतीचे बांधकाम, मध्य नागपुरात उभारण्यात येणारे नवे प्रकल्प व त्याचा आराखडा, कामठी मार्गावर तयार होणाऱ्या ४ स्तरीय आणि वर्धा मार्गावरील निर्माणाधीन ३ स्तरीय वाहतूक व्यवस्था, झाडांची यशस्वी स्तानांतरण प्रक्रिया (ट्री ट्रान्सप्लान्टेशन प्रोसेस), प्रकल्पात उपयोग करण्यात आलेले सौर ऊर्जेचा संच (सोलर पॅनल), महा मेट्रोने प्रस्थापित केलेले मानके (बेंचमार्क), अतिरिक्त उत्पनासाठी मेट्रोचे पर्यायी साधने (नॉन फेयर रेव्हेन्यू बॉक्स), देशातील पहिली स्वतःचे मेट्रो सेफ्टी पार्क, ५.५ हजार झाडांचे वृक्षरोपण झालेले लिटिल वूड, याचा प्रत्यक्ष देखावा याठिकाणी तयार करण्यात आला आहे.
याशिवाय जनसामान्यांपर्यंत पोहोचण्यासाठी मेट्रोचे विविध उपक्रम जसे मेट्रो संवाद, #धावणारमाझीमेट्रो कॅम्पेन, गणेश उत्सव स्पर्धा, सडक सुरक्षा सप्ताह ई. तसेच मेट्रो की पहल अंतर्गत आकर्षक कार्यक्रम जसे कर्मचाऱ्यांसाठी उन्हापासून बचावासाठी केलेली सोय, कर्मचाऱ्यांसोबत विविध सण साजरे करणे ई. सर्व बाबींचा तपशील आकर्षक कलाकृतीच्या साह्याने प्रदर्शनीत लावण्यात आले आहे. एकूणच प्रकल्पांतर्गत होत असलेल्या आणि होणाऱ्या निर्माणाधीन कार्याची हुबेहूब प्रतिकृती(थ्री डी ड्रॉईंग) लावण्यात आली आहे. प्रदर्शनाच्या मुख्य द्वारासमोर मेट्रोचे पिलर तयार करण्यात आले असून यावर डिजिटल स्क्रीन’च्या माध्यमातून धावती मेट्रो दाखविण्यात येणार आहे.
नागपूर मेट्रो प्रकल्पामुळे आता खऱ्या अर्थाने संत्रानगरी नागपूर आता स्मार्ट सिटी झाली आहे. नागपूरकरांसाठी ही अत्यंत अभिमानाची बाब असल्याची प्रतिक्रिया महा मेट्रोला मिळत आहे. अवघ्या चार वर्षाच्या कालावधीत मेट्रोचे प्रवासी रन सुरु करणाऱ्या महा मेट्रोने मानाचा तुरा रोअला आहे.