नागपूर : भारतीय मजदुर संघ प्रणित नागपूर मेट्रो रेल कंत्राटी कर्मचारी संघाच्या माध्यमातून अनेक दिवसांपासून नागपूर मेट्रोमध्ये कार्यरत असणाऱ्या कंत्राटी कामगारांचे आंदोलन सुरू होते. त्यानुसार या कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या मागण्यांबाबत आ.प्रवीण दटके यांनी वेळोवेळी शासनाकडे पाठपुरावा केला, मात्र यासंदर्भात कोणताही ठोस निर्णय घेण्यात आलेला नव्हता. आज मंत्रालय, मुंबई येथे झालेल्या बैठकीत मा. कामगार मंत्री श्री आकाश फुंडकर यांनी केंद्रीय वेतन श्रेणी नुसार दर लागू करावा असे निर्देश मेट्रोला दिले. तसेच सर्वच कंत्राटी कामगारकरिता एक समान कार्यक्रम आखणार असल्याचे सांगितले.
बैठकीच्या सुरुवातीला वेतनश्रेणीबाबत संपूर्ण कर्मचाऱ्यांमध्ये असंतोष निर्माण झाल्याचे आ. प्रवीण दटके यांनी सांगितले.
* कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या मागण्या
1.दुकान आणि अस्थापना दर रद्द करून नियमाप्रमाणे असलेला केंद्रीय वेतनश्रेणी दर कर्मचाऱ्यांना लागू करावा.
2.कंत्राट रद्द करून कंत्राटी कर्मचाऱ्यांना कायमस्वरूपी करण्याबाबत सकारात्मक निर्णय घ्यावा.
3.समान काम समान वेतन धोरणानुसार योग्य वेतनवाढ लागू करावी.
अशा मागण्या आ. दटके यांनी बैठकीत मांडल्या. त्यानुसार, पूर्वी प्रमाणेच केंद्रीय वेतन श्रेणी नुसार दर लागू करावा असे निर्देश मा. कामगार मंत्री श्री आकाश फुंडकर यांनी सचिव आणि मेट्रो यांना दिले. तसेच सर्व कर्मचाऱ्यांबाबत एक कलमी समान धोरण ठरविण्याकरिता प्रधान सचिव श्रीमती अश्विनी भिडे यांच्या उपस्थितीत बैठक लावण्याबाबत मा. मंत्री यांनी निर्देश दिले.
नागपूर मेट्रो रेल कॉर्परिशनच्या आस्थापनेवरील कार्यरत कंत्राटी कर्मचाऱ्यांना दिलासा दिल्याबाबत श्री दटके यांनी मा. मंत्री महोदयांचे आभार व्यक्त केले. यावेळी आ प्रवीण दटके, सचिव श्रीमती कुंदन,मेट्रोचे व्यवस्थापक श्री हर्डीकर यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंग द्वारे उपस्थिती लावली.