नागपूर: भारत सरकारच्या आरोग्य व कुटूंब कल्याण मंत्रालयाद्वारे महाराष्ट्र राज्यासाठी राष्ट्रीय रोग नियंत्रण केंद्र (एनसीडीसी) शाखा आणि मेट्रोपोलीटन सर्वेलन्स यूनिट (एमएसयू) नागपूर महानगरपालिकेमध्ये स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. मनपाच्या के.टी. नगर नागरी प्राथमिक आरोग्य केंद्राच्या इमारतीमध्ये मेट्रोपोलीटन सर्वेलन्स यूनिट (एमएसयू) सुरु करण्यात येणार आहे, अशी माहिती मनपाचे वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. दीपक सेलोकर यांनी दिली आहे.
यासंदर्भात राष्ट्रीय रोग नियंत्रण केंद्र (एनसीडीसी) दिल्ली, आरोग्य व कुटुंब कल्याण विभाग, मुंबई आणि नागपूर महानगरपालिका यांच्यामध्ये सामंजस्य करार करण्यात आला आहे. मनपामध्ये एमएसयू सुरू करण्याच्या अनुषंगाने आरोग्य व कुटूंब कल्याण विभाग दिल्लीचे संयुक्त सचिव श्री घुलाम मुस्तफा यांच्या अध्यक्षतेतील चमूने ८ व ९ डिसेंबर २०२४ रोजी नागपूरला भेट दिली होती. या चमूने प्रस्तावित एमएसयू करिता मनपाच्या के.टी. नगर आरोग्य केंद्राच्या इमारतीला भेट देउन पाहणी देखील केली होती.
आरोग्य व कुटूंब कल्याण विभाग दिल्लीचे संयुक्त सचिव श्री घुलाम मुस्तफा यांच्या अध्यक्षतेतील चमूने अतिरिक्त आयुक्त श्रीमती आंचल गोयल यांची भेट घेउन त्यांच्याशी मेट्रोपोलीटन सर्वेलन्स यूनिट (एमएसयू) बाबत चर्चा केली. यावेळी एपीएचओ नागपूर तथा राष्ट्रीय रोग नियंत्रण केंद्रच्या नोडल अधिकारी डॉ. आराधना भार्गव, वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. दीपक सेलोकर, अतिरिक्त वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. नरेंद्र बहिरवार यांच्यासह सार्वजनिक बांधकाम विभाग तसेच विद्युत आणि अग्निशमन विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
मेट्रोपोलीटन सर्वेलन्स यूनिट (एमएसयू) चा मुख्य उद्देश
१) आयडीएसपी अंतर्गत सूचीबद्ध आजारांचे सर्वेक्षण, तसेच सर्वेक्षण कामांचे बळकटीकरण करणे. (सूचीबद्ध आजार- Anthrax, Chicken Pox, Chikungunya, Dengue, Diphtheria, Human Rabies, Leptospirosis, Malaria, Measles, Meningitis, Mumps, Pertussis, Scrub Typhus, Typhus, Ebola Virus disease, Zika Virus, Nipah, Yellow Fever, Brucellosis etc.)
२) मेट्रोपोलीटन सर्वेलन्स यूनिट (एमएसयू) संसर्गजन्य रोगांच्या उद्रेकासाठी अलर्ट ओळखेल आणि प्रतिसादासाठी तांत्रिक मार्गदर्शन करेल.
३) मेट्रोपोलीटन सर्वेलन्स यूनिट (एमएसयू) सुरु झाल्यास त्याद्वारे विविध साथीच्या आजारांचे रोग सर्वेक्षण आणि त्यावर त्वरित उपाययोजना करणे साध्य होईल.
४) याकरिता केंद्रीय स्तरावरून निधी मंजूर करण्यात आलेला आहे. सुसज्य अशी प्रयोगशाळा येथे स्थापन करण्यात येणार आहे.