नागपूर – नागपूरच्या मां उमिया औद्योगिक वसाहतीत रविवारी मध्यरात्री अचानक लागलेल्या भीषण आगीत चार आरा मशीन जळून खाक झाल्या. ही आग इतकी तीव्र होती की संपूर्ण परिसरात एकच खळबळ उडाली. जिल्हाभरातून ११ अग्निशमन गाड्यांना पाचारण करण्यात आले आणि तब्बल १० तासांच्या प्रयत्नांनंतर आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आलं. या आगीत कोट्यवधी रुपयांचे नुकसान झालं आहे.
सुरेश नातिनानी यांची ‘अतुल वुड’ नावाची कंपनी मां उमिया औद्योगिक वसाहतीत आहे. त्यांच्या आरा मशीन परिसरात रात्री १ वाजता अचानक आग लागली. परिसरात मोठ्या प्रमाणावर लाकूड साठा असल्यामुळे आगीने वेग घेतला आणि काही क्षणातच चारही आरा मशीन्स आगीच्या भक्षस्थानी पडल्या.
१० तास शर्थीचे प्रयत्न –
घटनेची माहिती मिळताच कलमना, लकडगंज, त्रिमूर्ती नगर, सक्करदरा, कामठी, मिहान आदी केंद्रांमधून एकूण ११ अग्निशमन गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. जवानांनी सलग ५५ टँकर पाणी वापरत आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी १० तास शर्थीचे प्रयत्न केले. अखेर सकाळपर्यंत आग आटोक्यात आली.
मोठं आर्थिक नुकसान-
या दुर्घटनेत ४ आरा मशीन, मोठ्या प्रमाणातील लाकूड, ऑफिस, शेड यासह कोट्यवधी रुपयांचे साहित्य पूर्णपणे जळून खाक झाले. आग कशामुळे लागली हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही. अधिक तपास सुरू आहे.