सोलापूर: आज सकाळी ११:२२ वाजता सोलापूर जिल्ह्यात भूकंपाचा सौम्य धक्का जाणवला. राष्ट्रीय भूकंप विज्ञान केंद्राच्या माहितीनुसार, भूकंपाची तीव्रता २.६ रिश्टर स्केल इतकी नोंदवण्यात आली असून, सांगोला हा केंद्रबिंदू असल्याचे स्पष्ट झाले आहे.
नागरिक भयभीत; प्रशासन सतर्क-
भूकंपाचा केंद्रबिंदू ५ किमी जमिनीच्या आत असल्याने मोठे नुकसान झालेले नाही. मात्र, अचानक जमिनीला हादरे बसल्याने स्थानिक नागरिक भयभीत झाले असून, अनेकांनी घराबाहेर धाव घेतली. प्रशासनाने नागरिकांना शांत राहण्याचे आणि सुरक्षिततेच्या उपाययोजना करण्याचे आवाहन केले आहे.
देशभरात सातत्याने ‘या’ ठिकणी जाणवले भूकंपाचे धक्के-
गेल्या काही दिवसांत भारतात वेगवेगळ्या ठिकाणी भूकंप जाणवले आहेत:२ एप्रिल: सिक्किमच्या नामची येथे भूकंप.१ एप्रिल: लेह लडाखमध्ये भूकंप.३१ मार्च: अरुणाचल प्रदेश आणि सिक्किममध्ये जमिनीत कंपन.२८ मार्च: नेपाळमध्ये भूकंप, बिहारमधील काही भाग हादरले.२९ मार्च: हरियाणाच्या सोनीपत येथे २.३ रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंप.
भारतातील भूकंप संवेदनशील झोन-
भारतातील ५९% भूभाग भूकंपासाठी संवेदनशील आहे. भूगर्भशास्त्रानुसार, देशातील भूभाग चार झोनमध्ये विभागलेला आहे:झोन २: तुलनेने कमी धोक्याचा भाग.झोन ३: मध्यम धोका असलेला भाग.झोन ४: अधिक धोकादायक (दिल्ली आणि आसपासचा भाग).झोन ५: सर्वाधिक संवेदनशील, ७ रिश्टर स्केलपेक्षा तीव्र भूकंप होण्याची शक्यता.
सावधगिरी बाळगा, सुरक्षित राहा-
तज्ज्ञांनी नागरिकांना भूकंपाच्या धोक्यांपासून सावध राहण्याचा सल्ला दिला आहे. भूकंपाच्या वेळी सुरक्षित स्थळी थांबणे, पक्क्या इमारतींपासून दूर राहणे आणि प्रशासनाच्या सूचनांचे पालन करणे गरजेचे आहे.