नागपूर : राष्ट्रवादीचे शरद पवार गटाचे नेते माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी अजित पवार गटासंदर्भात मोठा गौप्यस्फोट केला. तुम्हाला जे खाते पाहिजे ते देतो; पण तुम्ही आमच्यासोबत या अशी ऑफर मला अजित पवार गटाने दिली होती.
मात्र शरद पवार यांना सोडून कधीच सत्तेत सहभागही होणार नाही असे मी ठामपणे सांगितले होते, असे देशमुख म्हणाले.
राष्ट्रवादी सत्तेत सहभागी होत असताना आमच्याकडून अनिल देशमुख यांचाही मंत्रिपदाचा प्रस्ताव देण्यात आला होता. मात्र भाजपने देशमुखांच्या मंत्रिपदाला नकार दिला, असा दावा अजित पवार यांनी केला. यावर आता देशमुख यांनी प्रत्युत्तर दिले.
अजित पवार यांनी सांगितल्याप्रमाणे मी अनेक बैठकीला प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, खासदार सुप्रिया सुळे यांच्यासोबत उपस्थित होतो. पण त्या बैठकीत चुकीचे निर्णय घेऊन शरद पवारांना त्रास देऊ नका, असे सांगत होतो. मंत्रिपदाची शपथ घेण्यासाठी आपल्याला अनेक फोन येत होते.
पण ज्या भाजपने खोट्या आरोपाखाली मला त्रास दिला त्यांच्यासोबत सत्तेत सहभागी होण्याचा प्रश्नच नव्हता. अजितदादा आज जे काही सांगत आहेत ते सांगण्यासाठी त्यांना सहा महिने का लागले? असा संतप्त सवालही देशमुख यांनी उपस्थित केला.