ठाणे: शासनाकडून हस्तांतरित करण्यात आलेल्या ७५ एकर जमिनीचा उपयोग सुयोग्य रीतीने करून मीरा भाईंदर पालिकेने नागरिकांना दर्जेदार सुविधा द्याव्यात असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.
मीरा-भार्इंदर महापालिकेने भार्इंदर पूर्वेकडे बांधलेले प्रमोद महाजन सभागृह आणि मीरा रोड पूर्वेकडील रामदेव पार्क परिसरातील मीनाताई ठाकरे मार्केट या दोन वास्तूंचे उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आयडियल पार्क येथे झाले ,त्यावेळी ते बोलत होते.
याप्रसंगी खासदार राजन विचारे, आमदार प्रताप सरनाईक, रवींद्र फाटक, महापौर डिम्पल मेहता, सभागृह नेता रोहिदास पाटील, विरोधी पक्ष नेते भोईर, आयुक्त बी.जी.पवार आदींची उपस्थिती होती.
मुख्यमंत्री यावेळी म्हणाले की, स्व. प्रमोद महाजन यांनी माझ्यासारखे असंख्य कार्यकर्ते घडविले आहेत. तर स्व. मीनाताई ठाकरे यांनी आईसारखे प्रेम सर्वांना दिले आहे. त्यांचे स्थान समाजात खूप मोठे आहे. शासनाकडून ६०० कोटी रुपये बाजारमूल्याची ७५ एकर जमीन मीरा भाईंदर पालिकेला हस्तांतरित करण्यात आली आहे. यात आमदार नरेंद्र मेहता यांचा पाठपुरावा होता, असे सांगून मुख्यमंत्री म्हणाले की या सर्व ठिकाणी मीरा भाईंदर पालिकेने दर्जेदार सुविधा उपलब्ध करून द्याव्यात.
प्रारंभी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते प्रमोद महाजन सभागृहाचे फित कापून उद्घाटन झाले तर नंतर स्व. मीनाताई ठाकरे मार्केटचे उद्घाटन इलेक्ट्रॉनिक पद्धतीने कळ दाबून करण्यात आले.
भार्इंदर पूर्वेकडील इंद्रलोक परिसरात प्रमोद महाजन सभागृह पालिकेने अत्याधुनिक पद्धतीने विकसित केले असून ते दुमजली इमारतीत साकारले आहे. पहिल्या व दुसऱ्या मजल्यावर एकावेळी ५०० जण बसू शकतील असे वातानुकूलित सभागृह असून तळमजल्यावरही सभागृहासाठी जागा राखीव ठेवली आहे.
मीरा रोड येथील रामदेव पार्क परिसरात मीनाताई ठाकरे मार्केट साकारले असून त्यात परिसरातील फेरीवाल्यांना प्राधान्यक्रमाने जागा देण्यात येत आहे.