नागपूर :ऐन उन्हाळयात तापमानाची तीव्रता लक्षात घेता प्रवाशांना सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी नागपूर रेल्वे स्थानकावर ‘मिस्टिंग सिस्टम’ कार्यान्वित करण्यात आले आहे. प्रवाशांना आता रेल्वे स्थानकावर गारेगार वातावरणाची अनुभूती मिळणार आहे.
सोमवारी या सिस्टमची ट्रायल घेण्यात आली असून मंगळवारपासून ती कार्यान्वित होणार आहे.
उन्हाळ्यांच्या सुट्ट्यांमुळे रेल्वे स्थानकावर खूप गर्दी असते. गर्दीत प्रवासाला निघालेल्या अनेकांना तापमानामुळे असह्य वाटायला लागते. हे लक्षात घेऊन ‘वर्ल्ड क्लास’ रेल्वे स्टेशनच्या रुपात झपाट्याने विकसित होत असलेल्या नागपूर स्थानकावर मिस्टिंग सिस्टम कार्यान्वित करण्याचे नियोजन रेल्वे प्रशासनाने केले होते.
मिस्टिंग सिस्टम नेमके कसे असते-
ही सिस्टम प्लेटफॉर्मच्या छतावर लावली जाते. बारिक पाईपच्या प्रत्येकी दोन मिटरवर एक पॉईंट असतो. त्याला सूक्ष्म छिद्र असतात. ही सिस्टम ॲटोमेटिक असल्याने फलाटावर रेल्वेगाडी येताच ही सिस्टम सुरू होते. पाईपमधून धूर बाहेर यावा तसे थंड पाण्याचे फवारे खाली येतात. त्यामुळे प्रवाशांना गर्मीपासून दिलासा मिळतो.