Published On : Wed, Dec 6th, 2017

नागपुरातील जनता चौक परिसरात आमदार बच्चू कडूच्या कार्यकर्त्यांकडून मनसेच्या अमरावती शहराध्यक्षांना मारहाण

नागपूर : आमदार बच्चू कडू यांना फोनवर धमकी देणाऱ्या अमरावती येथील मनसेचा जिल्हा अध्यक्ष संतोष बद्रे याच्यावर मंगळवारी सायंकाळी लोकमत चौकात प्राणघातक हल्ला करण्यात आला. आरोपी बद्रे याच्या अपहरणाच्या प्रयत्नात असताना पोलिसांनी एक किलोमीटर अंतरावर थांबविले. पोलिसांनी आरोपींकडून बद्रे यांची सुटका केली तर तुषार पुंडकर नावाच्या व्यक्तीला रंगेहात पकडले. अत्यंत व्यस्त लोकमत चौकात घडलेल्या या घटनेमुळे पोलिसांमध्ये खळबळ माजली आहे. धंतोली पोलीस रात्री उशिरापर्यंत तुषारचे साथीदार किशोर देशमुख, अभिनाश गायसुंदर, सय्यद अली ऊर्फ गव्हर्नर तसेच निखील गावंडे याचा शोध घेत होती.

आमदार बच्चू कडू यांनी मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्यावर केलेल्या टीकेमुळे संतोष बद्रे संतापले होते. त्याने दोन दिवसापूर्वी आमदार कडू यांना फोनवरून धमकाविले होते. दोन दिवसांपासून बद्रे याने दिलेल्या धमकीची आॅडिओ क्लिपिंग व्हायरल झाली होती. बद्रेचा मित्र व मनसेचा कार्यकर्ता दीपक वैद्य यांच्या पत्नीला उपचारासाठी धंतोली येथील रुग्णालयात भरती करण्यात आले आहे. दीपकसोबत बद्रे हे सोमवारी नागपुरात आले. सूत्रानुसार तुषार पुंडकर हा बच्चू कडू यांच्या जवळचा असल्याची माहिती आहे. आरोपी व बद्रे यांच्यात चर्चाही झाली होती. आरोपींनी बद्रे याला अमरावतीमध्ये येऊन बच्चू कडू यांची माफी मागण्यास सांगितले होते. परंतु चर्चेत काहीच समाधान निघाले नाही.

मंगळवारी सायंकाळी ६.३० च्या सुमारास बद्रे आपल्या दोन मित्रांसोबत बाईकवर धंतोली उद्यानाकडून लोकमत चौकाकडे जात होते. दरम्यान आरोपी बोलेरो वाहनातून आले, बद्रेच्या दुचाकीला ओव्हरटेक करून गाडी थांबविली. त्यांनी बद्रेवर हल्ला केला. काठी आणि लोखंडी सळाखीने मारहाण केली. बद्रेने स्वत:ला वाचविण्याचा प्रयत्न केला. त्यांच्यासोबत असलेले मित्र पळून गेले. रस्त्यावरून जाणाºया एका युवकाने बद्रे यांचा बचाव करण्याचा प्रयत्न केला. परंतु आरोपींनी त्याला दूर होण्यास सांगितले. मारहाणीनंतर बद्रेच्या तोंडाला कापड बांधून त्यांना बोलेरोमध्ये कोंबले व तेथून पसार झाले. घटनेच्या वेळी लोकमत चौकात चांगलीच वर्दळ होती. परंतु हल्लेखोरांना थांबविण्याचा कुणीच प्रयत्न केला नाही.

Gold Rate
Monday 10 Feb. 2025
Gold 24 KT 85,600 /-
Gold 22 KT 79,600 /-
Silver / Kg 96,000 /-
Platinum 44,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

लोकमत चौकात पोलिसांचे वाहन उभे होते. त्यातील पोलीस कर्मचाऱ्यांनीही आरोपींना पकडण्याचा प्रयत्न केला नाही. हल्लेखोरांनी बद्रेला गाडीत कोंबल्यानंतर पोलीस कर्मचारी तेथे पोहचले. त्यांनी सहकाºयांना सूचना दिली. दरम्यान अमरावती मार्गावर गस्तीवर तैनात असलेल्या पोलीस पथलाला अलर्ट करण्यात आले. पोलिसांनी कृपलानी चौकात बोलेरोला थांबविले. पोलिसांना बघून हल्लेखोर पसार झाले. यातील तुषार पुंडकर हा पोलिसांच्या हाती लागला. बद्रे जखमी अवस्थेत गाडीत बसले होते. तुषारला ताब्यात घेऊन बद्रेला रुग्णालयात दाखल करण्यात आले. प्रकरण राजकीय असल्याने पोलीस प्रकरणाची गंभीरतेने चौकशी करीत आहेत. गुन्हे शाखा व धंतोली पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्यांनी रुग्णालयात जाऊन बद्रे यांची विचारपूस केली आहे. तुषारकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांना अन्य हल्लेखोरांची माहिती मिळाली आहे.

बद्रे यांच्यावरील हल्ला हा सुनियोजित होता. काही हल्लेखोर बोलेरोतून तर काही दुचाकीने आणि पायीसुद्धा होते. या घटनेमुळे कायदा व सुव्यवस्थेची पोलखोल झाली आहे. आरोपी बद्रेला धडा शिकविण्यासाठी सकाळीच नागपुरात आले होते. ते संधीच्या शोधात होते. अमरावतीला परततानाच बद्रेला धडा शिकविण्याचा त्यांचा इरादा होता. बद्रे यांचा अमरावतीत आॅनलाईन लॉटरी व प्रॉपर्टी डीलिंगचा व्यवसाय आहे.

सिनेमा स्टाईलमध्ये केला हल्ला

हल्लेखोरांनी सिनेमा स्टाईलमध्ये बद्रेवर हल्ला केला. लोकमत चौकात ही घटना घडत असताना पळापळ झाली होती. घटनेनंतर अर्धा तास दुचाकी घटनास्थळावरच पडून होती. घटनास्थळावरील पोलीस कर्मचाऱ्याच्या दुर्लक्षामुळे हल्लेखोर पळून जाण्यात यशस्वी झाल्याचे प्रत्यक्षदर्शीनी सांगितले.

Advertisement