नुकसान भरपाई मिळवून देणार तीन तालुक्यात केली पाहणी
नागपूर : गेल्या आठ दिवसांत झालेल्या पावसामुळे जिल्ह्यात शेतीचे तसेच अनेकांचे वैयक्तिकही नुकसान झाले. माजी उर्जामंत्री आमदार चंद्रशेखर बावनकुळे यांनी कामठी, कुही, भिवापूर या तीन तालुक्यातील पूरग्रस्त गावांची पाहणी करून तेथील नागरिकांची भेट घेतली. पाऊस तसेच पूरामुळे झालेल्या नुकसानीची शासनाकडून भरपाई मिळवून देण्याची ग्वाही देत त्यांनी नागरिकांना दिलासा दिला.
संततधार पावसामुळे अनेक गावांमध्ये पाणी शिरले. अनेकांची शेती पाण्याखाली आली. त्यामुळे शेतकऱ्यांचे तसेच अनेक नागरिकांचे वैयक्तिक नुकसान झाले.
माजी उर्जामंत्री आमदार चंद्रशेखर बावनकुळे यांनी या नुकसानग्रस्त भागाचा आजपासून दौरा सुरू केला. आज त्यांनी कामठी तालुक्यातील सोनेगाव, कुही तालुक्यातील कुचाडी-मोहाळी, भिवापूर तालुक्यातील चिखलापार या नुकसानग्रस्त गावांमध्ये पाहणी केली. येथील नागरिकांशी चर्चा केली. शेती तसेच घरांचे झालेल्या नुकसानीबाबत आमदार बावनकुळे यांनी माहिती घेतली. अनेकांच्या घरी भेट देत नुकसानीची पाहणीही केली.
आमदार बावनकुळे यांनी नागरिकांना राज्य शासनाकडून शक्य तेवढी नुकसानभरपाई मिळवून देण्यात येईल, अशी ग्वाही दिली. त्यामुळे नुकसानीमुळे निराशेत असलेल्या शेतकरी व नागरिकांना मोठा दिलासा मिळाला. या दौऱ्यात त्यांच्यासमवेत आमदार टेकचंद सावरकर, जिल्हा भाजपाध्यक्ष अरविंद गजभिये, माजी आमदार सुधीर पारवे, किशोर रेवतकर, अविनाश खळतकर, इमेश्वर यावलकर, अजय बोढारे उपस्थित होते.