नागपूर : केंद्र सरकारच्या लोककल्याणकारी योजनांची माहिती सर्वसामान्य नागरिकांपर्यंत पोहोचविण्याच्या उद्देशाने देश पातळीवर सुरू असलेल्या विकसित भारत संकल्प यात्रा मोहिमेअंतर्गत सोमवार (ता४) रोजी गांधीबाग झोन येथील गाड़ीखाना शाळा मैदान आणि साने गुरुजी शाळा मैदान येथे विशेष शिबिराचे आयोजन करण्यात आले. शिबिराचे उद्घाटन आमदार श्री. प्रवीण दटके यांच्या हस्ते करण्यात आले.
केंद्र आणि राज्य शासनाच्या जनकल्याणकारी योजनांची माहिती सर्वसामान्य नागरिकांपर्यंत पोहोचविणाऱ्या ‘विकसित भारत संकल्प यात्रेतील योजनांची माहिती, प्रचार व प्रसिद्धीसाठी सुसज्ज व्हॅन्स अर्थात रथ मनपाच्या दहाही झोन मध्ये फिरत असून, विविध शिबीर घेत नागरिकांपर्यंत लाभ पोहोचविण्यात येत आहे. याअंतर्गत गांधीबाग झोन येथे विशेष शिबीर घेण्यात आले.
याप्रसंगी गांधीबाग झोनचे सहायक आयुक्त श्री. गणेश राठोड, माजी नगरसेवक प्रमोद चिखले यांच्यासह मनपाचे अधिकारी व कर्मचारी प्रामुख्याने उपस्थित होते. शिबिरात सहायक आयुक्त श्री. गणेश राठोड यांनी उपस्थितांना “विकसित भारतासाठी”ची शपथ दिली. या विशेष शिबिराला नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
“विकसित भारत संकल्प यात्रेच्या माध्यमातून केंद्र शासनाच्या विविध योजना थेट नागरिकांपर्यंत पोहोचविण्यात येत असून, मनपाद्वारे अंमलबजावणी करण्यात येत असलेल्या केंद्र सरकार आणि राज्य सरकारच्या विविध योजना नागरिकांपर्यंत पोहोचविण्याचे कार्य केले जात आहे. मनपाद्वारे झोननिहाय पीएम स्वनिधी योजना, प्रधानमंत्री आवास योजना, स्वच्छ भारत मिशन, अमृत योजना आणि ई-बस या योजनांबाबत जनजागृती करण्यात येत आहे. याशिवाय शिबिरांमध्ये प्रधानमंत्री उज्वला योजना, राष्ट्रीय क्षयरोग दुरीकरण कार्यक्रम, पी.एम.स्वनिधी बद्दल माहिती तसेच असंसर्गजन्य आजार निदान व उपचार देखील दिल्या जात आहेत.
विकसित भारत संकल्प यात्रा मोहिमेंतर्गत मंगळवार(०५) रोजी सतरंजीपुरा झोन येथील झोन कार्यालय आणि आदिवासी कॉलनी राणी दुर्गावती चौक येथे आयोजित केल्या जाणार आहे. तरी नागरिकांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन मनपातर्फे करण्यात आले आहे.