नागपूर : गोवर व रुबेला या रोगांच्या उच्चाटनासाठी राज्य सरकारने कंबर कसली आहे. राज्य शासनाच्या निर्देशानुसार येत्या नोव्हेंबर महिन्यापासून नागपूर महानगरपालिकेच्यावतीने लसीकरण मोहीम राबविण्यात येणार आहे. लसीकरण मोहिमेंतर्गत शहरातील महानगरपालिकेच्या शाळांसह सरकारी व खासगी शाळा तसेच ९ ते १५ वर्ष वयोगटातील सर्व मुलांना एम.आर. लस देण्यात येणार आहे.
या मोहिमेसाठी शहरातील शिक्षण विभागातील यू.आर.सी.१ (प्राथमिक) व यू.आर.सी.२ (माध्यमिक) शाळा केंद्रांमध्ये आणि महानगरपालिका शिक्षण विभाग अशा एकूण ३० ठिकाणी मुख्याध्यापकांचे प्रशिक्षण घेण्यात आले. प्रशिक्षणाला शहरातील सर्व शाळांचे मुख्याध्यापक प्रामुख्याने उपस्थित होते.
आरोग्य अधिकारी (दवाखाने) डॉ. अनिल चिव्हाणे, जागतिक आरोग्य संघटनेचे आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. साजिद खान, नोडल अधिकारी डॉ. सुनील घुरडे, डॉ. नंदकिशोर राठी, डॉ. विजय जोशी, डॉ. नरेंद्र बहिरवार, समन्वयक दिपाली नागरे यांच्यासह दहाही झोनचे वैद्यकीय अधिकारी लसीकरण मोहिमेच्या प्रशिक्षण वर्गात सहभागी झाले होते.