नागपूर : शहरातील दुकानांवर अद्यापही ठळक अक्षरात मराठी पाटया लावण्यात आल्या नसल्याने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने यावरून आक्रमक पवित्रा घेतला आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नागपूर दक्षिण -पश्चिम विभागाचे उपाध्यक्ष राहुल पांडे यांच्यासह महिला अध्यक्ष संगीता सोनटक्के-सहारन, शाखा अध्यक्ष अमन पवनकर, सागर मानकर आणि मिलिंद मुंगले यांनी अलीकडेच शेकडो दुकानमालकांशी संपर्क साधून त्यांचे फलक मराठीत दाखविण्याची विनंती केली आहे. जर दुकानदारांनी असे केले नाही तर त्यांना गंभीर परिणामाला जावे लागणार असा इशाराही कार्यकर्त्यांच्या वतीने देण्यात आला.
आम्ही अनेक दुकानदारांना कायद्याचे पालन करण्याची विनंती केली आहे आणि त्यांच्याकडूनही सकारात्मक प्रतिसाद मिळाला आहे. परंतु खामला चौकात असलेल्या मारुती सुझुकी कार्ससह काहींनी ते स्वीकारण्यास नकार दिला आहे आणि जर हे लोक नियम लागू करण्यात अयशस्वी ठरले तर गंभीर परिणाम यांना भोगावे लागणार असा इशारा पांडे यांनी दिला.
मार्च 2022 मध्येच महाराष्ट्र सरकारने राज्यातील सर्व दुकानांवर मराठीत लिहिलेला फलक असावा असा नियम लागू केला आहे. मात्र, त्याची अंमलबजावणी नियोजनानुसार झाली नाही. अनेक ठिकाणी दुकानांवर मराठीत छोट्या नावाच्या पाट्या लावण्यात आल्या असून अनेक ठिकाणी दुकानदार या नियमाची पायमल्ली करताना दिसतात. मात्र आता याविरोधात मनसेने आक्रमक पवित्रा घेतल्याचे पाहायला मिळत आहे.