मुंबई – राज्यात मराठी भाषेच्या वापराबाबत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने पुन्हा एकदा आपली आक्रमक भूमिका घेतली. बँकांमध्ये मराठीचा वापर होत आहे का, याची तपासणी करण्यासाठी मनसे कार्यकर्ते विविध बँक शाखांमध्ये पोहोचत आहेत. यामुळे बँकिंग क्षेत्रात गोंधळाचे वातावरण निर्माण झाले असून, बँक कर्मचाऱ्यांनी आता थेट मुख्यमंत्र्यांकडे संरक्षणाची मागणी केली आहे.
गुढीपाडवा मेळाव्यात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आपल्या कार्यकर्त्यांना मराठी भाषेच्या वापराबाबत अधिक सजग राहण्याचे आदेश दिले होते. त्यानंतर मुंबई, पुणे, ठाणेसह राज्यभरातील मनसे कार्यकर्ते बँकांमध्ये भेट देऊन मराठीमध्ये सेवा दिली जाते का, याची माहिती घेत आहेत. काही ठिकाणी या भेटीदरम्यान बाचाबाची झाल्याच्या घटनाही घडल्या आहेत.
या पार्श्वभूमीवर, बँक ऑफ महाराष्ट्र ऑफिसर्स असोसिएशनचे अध्यक्ष राजीव ताम्हाणे यांनी मुख्यमंत्री आणि संबंधित अधिकाऱ्यांना पत्र लिहून बँक कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेसाठी ठोस उपाययोजना करण्याची मागणी केली आहे.
मुख्य मागण्या पुढीलप्रमाणे आहेत:
– बँकांमध्ये गोंधळ घालणाऱ्या व्यक्तींवर तात्काळ आणि कठोर कारवाई करण्यात यावी.
– स्थानिक प्रशासनाला बँक कर्मचाऱ्यांची सुरक्षा सुनिश्चित करण्याचे निर्देश द्यावेत.
-बँक व्यवस्थापनानेही कर्मचारी सुरक्षेसंदर्भात स्पष्ट धोरण आखावे
– जर कारवाई करण्यात आली नाही, तर कर्मचाऱ्यांकडून संप किंवा कायदेशीर आंदोलनाचा मार्ग अवलंबला जाऊ शकतो.
मनसेने मराठीचा मुद्दा हाती घेतल्यामुळे भाषेच्या वापरासाठी दबाव वाढतो आहे, मात्र त्यामुळे बँकांतील शिस्त आणि कामकाजावर परिणाम होत असल्याचे कर्मचारी संघटनांचे म्हणणे आहे. याप्रकरणी सरकारने लवकरात लवकर मध्यस्थी करून दोन्ही बाजूंना न्याय देणारी भूमिका घ्यावी, अशी मागणी सर्वत्र होत आहे.