नागपूर : येत्या विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर मनसे अध्यक्ष राज ठाकरे चांगलेच सक्रिय झाले आहेत.राज्याभरात पक्षाची ताकद वाढवण्यासाठी त्यांनी दौरे सुरु केले आहेत.ऑगस्टमध्ये मराठवाडा आणि विदर्भातील प्रत्येक जिल्ह्यातील अधिकाऱ्यांच्या बैठका घेऊन राज ठाकरे महिनाभरात पुन्हा अमरावतीत येत आहेत. त्यामुळे विदर्भातील 11 जिल्ह्यांतील मनसेच्या पदाधिकाऱ्यांना अमरावती येथे बोलावण्यात आले आहे.
राज ठाकरे शुक्रवार, 27 सप्टेंबर रोजी पश्चिम विदर्भातील अमरावती, अकोला, वाशीम, बुलढाणा, यवतमाळ येथे आणि शनिवार, 28 सप्टेंबर रोजी अमरावती येथील हॉटेल ग्रँड मेहफिल येथे वर्धा, नागपूर, भंडारा, गडचिरोली, चंद्रपूर, गोंदिया जिल्ह्यातील अधिकाऱ्यांसोबत विदर्भाची बैठक घेणार आहे.
राज ठाकरे यांनी विधानसभेच्या दृष्टिकोनातून विदर्भात विशेष प्रयत्न करण्याचे ठरवले असून त्याचा केंद्रबिंदू अमरावती असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.
ही सभा अमरावती शहर व जिल्ह्याच्या वतीने संपूर्ण विदर्भात आयोजित करण्यासाठी मनसेच्या सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांकडून प्रयत्न सुरू आहेत. शुक्रवारी सकाळी 7.30 वाजता अमरावती रेल्वे स्थानकावर राज ठाकरे यांचे जंगी स्वागत करण्यात येणार आहे,अशी माहिती मनसे अमरावती शहर अध्यक्ष धीरज तायडे व बडनेरा शहर अध्यक्ष गौरव बांते यांनी दिली आहे.