मुंबई/नागपूर: नागपूर शहर आणि जिल्ह्यातील आयटीआयच्या इमारती आधुनिक पद्धतीने बांधून स्मार्ट सिटीप्रमाणेच आयटीआयही स्मार्ट करा असे निर्देश पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी कौशल्य विकास व व्यवसाय प्रशिक्षण विभागाला दिले. या बैठकीला प्रामुख्याने कौशल्य विकास व कामगार कल्याण मंत्री संभाजीराव निलंगेकर उपस्थित होते.
सह्याद्री अतिथीगृहात मुंबईत ही बैठक झाली शहरातील आयटीआयच्या जागेची आज देखभाल होऊ शकत नाही. आयटीआयच्या इमारतीच्या इमारतीसह संपूर्ण परिसराचा विकास करून येथे ग्रीन बेल्ट विकसित करण्यावर बावनकुळे व निलंगेकर यांनी भर दिला. या जागेच्या विकासाचे प्रस्ताव तयार करून शासनाकडे सादर करा. यासाठी आवश्यक असेल तर सल्लागार एजन्सी नेमा, अशी सूचनाही पालकमंत्री बावनकुळे यांनी केली.
जिल्ह्यातील आयटीआय आधुनिकरणासाठी आवश्यक निधी जिल्हा नियोजन समितीतून दिला जाईल. जिल्ह्यातील प्रत्येक विधानसभा मतदारसंघात एक आयटीआय चंद्रपूर लातूरच्या धर्तीवर आधुनिकरणाचे एक मॉडेल तयार करून विकसित करण्याच्या सूचना देण्यात आल्या. यात मौदा, काटोल, कुही, रामटेक, सावनेर आदींचा समावेश होऊ शकेल.
काटोल तालुक्यातील भोरगड येथील आदिवासी आश्रमशाळा इमारत पडून आहे। ही इमारत 40 कोटींची असून 50 मुली व 50 मुले येथे आयटीआयचे प्रशिक्षण घेऊ शकतील, अशी ही इमारत आहे. ही इमारत आयटीआयने ताब्यात घ्यावी. आदिवासी मुलांसाठी येथे आयटीआय सुरू करता येईल, असेही पालकमंत्री बावनकुळे यावेळीं म्हणाले.