वाडी(प्र):आयुध निर्माणी अंबाझरी सहित देशातील सर्व आयुध कारखान्यांचा सरकारी दर्जा कायम रहावा आणि प्रस्तावित निगमीकरण रद्द व्हावे या एकमेव मागणी करिता आयुध निर्माणी अंबाझरी येथील बंद १०० % यशस्वी झाल्याचे दिसून आले.केंद्रातील भाजप मोदी सरकारने एकतर्फी निर्णय घेत देशातील ४१ आयुध निर्माणीच्या निगमीकरण व पर्यायाने खासगीकरण करण्याचा देशविघातक निर्णयाविरोधात एक लाख कर्मचारी त्यांच्या परिवारात तीव्र असंतोष निर्माण झाला आहे.देशाची सुरक्षा व्यवस्था खासगी उद्योगांच्या हातात देणे अत्यंत घातक असल्याने व मोदी सरकार आपल्या उद्योगपती मंत्र्यांच्या भल्यासाठी हा निर्णय घेत असल्याने २०० वर्षांचा इतिहास लाभलेल्या या आयुध निर्माणी कर्मचाऱयांनी मागील १ महिन्यापासून परिवारासह आंदोलन सुरू केले आहे.
असे असूनही मोदी सरकार हट्ट धरल्याप्रमाणे हा प्रस्ताव मंजूर करण्याच्या विचारात आहे. या आयुध निर्माणीचे निगमीकरण थांबविण्यासाठी आता १ लाख कर्मचाऱ्यांनी सरकारला वठणीवर आणले व देशभक्तीचे खोटे नाटक उघडे पाडण्यासाठी ३० दिवसांच्या ऐतिहासिक संपाला २० ऑगस्टपासून सुरुवात केली आहे.यादरम्यान देशातील ४१ आयुधनिर्माणी कारखान्यांना देशाच्या सैन्य व्यवस्थेला लागणारा बारूद, बंदुका,गोळ्या,वाहन, कपडे इत्यादीची निर्मिती बंद होणार असल्याने मोदींच्या हट्टापायी देशाची सुरक्षा धोक्यात येण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
स्थानिक आयुध निर्माणी अंबाझरी येथे मंगळवार २० ऑगस्टपासून संपाला जोरदार सुरुवात झाल्याचे दिसून आले. आयुध निर्माणीत कार्यरत रेड युनियन,इंटक युनियन,लोकशाही कामगार फेडरेशन सोबत भारतीय जनता पार्टीची संलग्नीत भारतीय मजदूर संघ देखील भगवा झेंडा घेऊन आपल्याच सरकारच्या विरोधात मुर्दाबादचे नारे लावून संताप व्यक्त करीत आहे.पहिल्याच दिवशी संपाला १०० टक्के प्रतिसाद मिळाल्याचे दिसून आले सर्व कामगार,कनिष्ठ अधिकारी वर्ग,कार्यालयीन कर्मचारी संपात उतरल्याने संपूर्ण उत्पादन व प्रशासकीय कार्य ठप्प झाल्याचे दिसून आले.सुरक्षेच्या दृष्टीने फॅक्टरी प्रशासनाने पोलीस,राज्य राखीव पोलीस बल,डिफेन्स सुरक्षा बल यांची तैनाती केली असून दत्तवाडी येथे असलेले डिफेन्स प्रवेशद्वार बंद करण्यात आले आहे तर आठवा मैल परिसरा समक्ष डिफेन्स प्रवेशद्वार सुरू असून कडक बंदोबस्त दिसून आला.
फॅक्टरीच्या तिन्ही प्रवेशद्वारांवर चारही कामगार संघटनेचे गिरीश खाडे,बी.बी. मजूमदार,विनोद कुमार,आशीष पाचघरे,दीपक गावंडे,क्षीरसागर, विनोद रामटेके ,राकेश खाडे,इंटक चे प्रवीण महल्ले,सुभाष पडोळे,अरविंद सिंह,अंजुम,बी.पी.एम.एस चे राष्ट्रीय महामंत्री आर.पी.चवरे,अध्यक्ष बंडू तिड़के,ओ.पी.उपाध्याय,ब्रिजेश सिंह,संजय वानखेड़े,अतुल चवरे, लोकशाही कामगार यूनियन चे अध्यक्ष जगदीश गजभिये,वेदप्रकाश सिंह, अविनाश रंगारी,सुदर्शन मेश्राम,सतीश बागड़े सह खुर्शीद पठान,अबनिष मिश्रा,प्रेमसागर
इत्यादीच्या नेतृत्वात शेकडो कामगारांनी रस्त्यावर दुतर्फा उभे राहून जोरदार केंद्र सरकार व मोदी सरकारचा धिक्कार करून निगमीकरण व खासगीकरण रद्द करण्याचे जोरदार नारे लावले.
संयुक्त कामगारांच्या या शस्त्रनिर्मिती बंद आंदोलनाने देशाची वर्तमान व भविष्याची सुरक्षा धोक्यात येणार असल्याने आता ३० दिवस चालणाऱ्या संपाकडे मोदी सरकार काय उपाय करते.याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. तर कामगार मात्र मोदी सरकारने हा देश विघातक निर्णय रद्द केल्याशिवाय माघार घेणार नसल्याचे चर्चेत सांगितले.आयुध निर्माणीतील सुरक्षा रक्षक देखील काळ्या फिती लावून ड्युटी बजावत आहेत तर अत्यावश्यक सेवेतील रुग्णालय,डॉक्टर,परिचारिका, अग्निशमन,सुरक्षा इ.चे कर्मचारी कर्तव्यावर उपस्थित दिसून आले.मात्र त्यांनीही केंद्र शासनाचा हा निर्णय धोकादायक असल्याने पुनर्विचार करावा अशी इच्छा प्रकट केली.
दरम्यान आंदोलन स्थळी आज शहर काँग्रेस अध्यक्ष विकास ठाकरे,युवा नेते विशाल मुत्तेमवार यांनी आयुध निर्माणी अंबाझरी येथे सुरू असलेल्या या आंदोलनाला भेट दिली आणि पाठींबा जाहीर केला.