Published On : Tue, Apr 30th, 2024
By Nagpur Today Nagpur News

गुजरातला उद्योगधंदे पळवताना मोदींना महाराष्ट्राची आठवण झाली नाही; नाना पटोलेंचा हल्लाबोल

Advertisement

मुंबई :पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्रातील सोलापूर, सातारा व पुण्यातील प्रचारसभेतून तेच तेच काँग्रेस विरोधी रडगाणे गायिले. मोदी यांना प्रचारासाठी सातत्याने महाराष्ट्रात यावे लागते हे भाजपाचा दारूण पराभव होत असल्याचे स्पष्ट संकेत आहेत. महाराष्ट्रातील मोठे उद्योग, गुंतवणूक व रोजगार गुजरातला पळवून नेले त्यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना महाराष्ट्राची आठवण झाली नाही, कांद्यावरील निर्यात बंदी उठवताना मोदींना महाराष्ट्राची आठवण झाली नाही फक्त गुजरात आठवला, आज पराभव दिसू लागल्याने पंतप्रधान मोदींना महाराष्ट्राची आठवण झाली का? असा सवाल करत महाराष्ट्रातील जनता आता मोदींच्या भुलथापांना बळी पडणार नाही, असा इशारा महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी दिला.

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या विधानांचा समाचार घेत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले की, नरेंद्र मोदी धादांत खोटे बोलत आहेत, खोटे बोलण्यात नरेंद्र मोदींचा कोणी हात धरू शकत नाही. काँग्रेस पक्ष आरक्षण संपवत आहे हा मोदी यांचा आरोप अत्यंत चुकीचा व हास्यास्पद आहे. देशाला स्वातंत्र्य मिळवून दिल्यानंतर लोकशाही व्यवस्था व संविधान तसेच संविधानाच्या माध्यमातून सर्वसामान्य गरीब जनता, एससी, एसटी, मागासवर्गीयांना हक्क व अधिकारासह आरक्षणही दिले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानाला व संविधानाने दिलेल्या आरक्षणाला राष्ट्रीय स्वयंसेवक संघ व भारतीय जनता पक्षाचा पहिल्या पासूनच विरोध आहे. मागील १० वर्षात धनगर, आदिवासी, मराठा समाजाला आरक्षण देतो म्हणून त्यांची घोर फसवणूक करणाऱ्या भाजपावर आता जनता विश्वास ठेवणार नाही. ओबीसींच्या आरक्षणाचा घोळ घालून राजकीय प्रतिनिधीत्व मिळण्यापासून या समाजाला वंचित ठेवण्याचे पाप ह्याच नरेंद्र मोदी, देवेंद्र फडणवीस व भाजपाने केले आहे. ४०० जागा जिंकल्या की आरक्षण बदलू असे जाहीर सांगणारे मोदींचे खासदार व मंत्रीच आहेत पण जनता भाजपाला घरी बसवणार याची जाणीव होताच मोदींनी भाषा बदलली. आरक्षणाचे खरे विरोधक भाजपा, आरएसएस व नरेंद्र मोदी आहेत व संधी मिळाली तर ते डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे संविधान बदलणार हे स्पष्ट आहे.

Gold Rate
16April 2025
Gold 24 KT 95,000/-
Gold 22 KT 88,400/-
Silver / Kg - 96,200/-
Platinum 44,000 /-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

काँग्रेस पक्षाने दलित नेत्यांचा अपमान केला हे आणखी एक असत्य व खोटारडे विधान नरेंद्र मोदी करत आहेत. माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांना नवीन संसद भवनच्या पायाभरणी कार्यक्रमाला नरेंद्र मोदी यांनी बोलावले नाही. महामहिम राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी अयोध्येतील राम मंदिराच्या उद्घाटन सोहळ्याला बोलावले नाही, संसदेच्या नवीन इमारतीच्या उद्घाटनालाही बोलावले नाही, कारण त्या आदिवासी समाजाच्या आहेत म्हणून, हा त्यांचा अपमान नाही का? परंतु मोदी म्हणजे खोटे बोल पण रेटून बोल. मागील १० वर्षात देशातील दलित, मागास, अल्पसंख्याक समाजावरील अत्याचारात प्रचंड वाढ झाली आहे, हे मोदी विसरले असतील पण जनता विसरली नाही.

भाजपाच्या नेत्यांनी छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यासह महापुरुषांचा सातत्याने अपमान केला. शिवाजी महाराज हे भाजपाला फक्त मतांसाठी हवे आहेत, निवडणुका आल्या की छत्रपतींचे नाव घेता व नंतर त्यांचा अपमान करता हीच भाजपाची निती आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी ५ वर्षात सोलापुरात पाचवेळा आले पण ५ लोकांनाही रोजगार देऊ शकले नाहीत. शहराला सात दिवसातून एकदा पाणी येते, हर घर नल, नल में जल ही मोदी यांची योजना सोलापुरात फेल गेली आहे, सोलापुरात नल है पर नल में जल नही, अशी परिस्थिती असल्याचे नाना पटोले म्हणाले.

Advertisement
Advertisement