- भाजप सरकारकडून जनतेची फसवणूक
- भाजपचा दाऊदशी काय संबंध आहे ते सप्ष्ट करावे
मुंबई: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील भाजपचे सरकार सर्वच आघाड्यावर अपयशी ठरले असून भाजपच्या राज्यात जवान आणि किसान दोघेही मरत आहेत. भाजपने निवडणुकीत दिलेले एकही आश्वासन पूर्ण केले नसून देशातील जनतेची फसवणूक केली आहे अशी घणाघाती टीका अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे प्रवक्ते आणि माजी केंद्रीय गृहराज्यमंत्री आर. पी. एन. सिंह यांनी केली आहे.
मुंबई येथे पत्रकारपरिषदेत बोलताना सिंह यांनी मोदी सरकारच्या तीन वर्षाच्या कामकाजावर जोरदार टीका केली ते म्हणाले की, मोदी सरकारच्या तीन वर्षाच्या काळात सीमेपलीकडून होणा-या दहशतवादी हल्ल्यांमध्ये रोज जवान शहीद होत आहेत तर दुसरीकडे सरकारच्या शेतकरी विरोधी धोरणामुळे देशात शेतकरी रोज आत्महत्या करित आहेत. अशी परिस्थिती असताना सरकारला तीन वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त जल्लोष केला जातोय. हा जल्लोष म्हणजे देशातील जनतेच्या जखमेवर मीठ चोळण्याचा प्रकार आहे. निवडणुकीत दिलेले एकही आश्वासन भाजप सरकारने पूर्ण केले नसून मनमोहन सिंग यांच्या नेतृत्वाखालील काँग्रेस सरकारने सुरु केलेल्या विकास कामांची उद्घाटने करण्याचेच काम मोदी गेल्या तीन वर्षापासून करित आहेत. भाजप सत्तेत आल्यावर दरवर्षी दोन कोटी बेरोजगारांना नोक-या देऊ असे आश्वासन मोदींनी दिले होते, मात्र गेल्या तीन वर्षात अवघ्या पाच लाख लोकांना रोजगार मिळाला आहे. याऊलट नोटाबंदीनंतर अनेक कंपन्यांनी कर्मचारी कपात केली असून हजारो लोक बेरोजगार झाले आहेत. देशातल्या युवकांची फसवणूक मोदी सरकारने केली आहे असे सिंह म्हणाले.
ते पुढे म्हणाले की, मोदी सरकारकडे परराष्ट्र धोरणच नाही. पाकिस्तान सीमेवर दररोज कुरापती काढून शस्त्रीसंधीच उल्लंघन करित आहे. पाकिस्तानी सैन्य आणि दहशतवाद्यांशी लढताना आपले जवान सीमेवर शहिद होत आहेत अशा वेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी नवाज शरिफ यांच्या वाढदिवसाला पाकिस्तानात जाऊन त्यांना केक भरवतात. मनमोहन सिंह यांनी 10 वर्ष पंतप्रधान असताना एकदाही पाकिस्तानचा दौरा केला नाही. भारतात दहशवादी कारवाया करणा-या आयएसआय या पाकिस्तानी गुप्तहेर संघटनेला भारतात बोलावून पठाणकोट हल्ल्याचा तपास करण्यास परवानगी दिली हाच भाजपचा राष्ट्रवाद आहे का ? विरोधी पक्षात असताना आम्ही सत्तेवर आल्यास पाकिस्तानने भारताचा एक सैनिक मारल्यास पाकिस्तानचे 10 सैनिक मारू अशा वल्गना करणारे आता सत्तेत असून गप्प का आहेत? असा सवाल त्यांनी केंद्र सरकारला केला.
भाजप सरकारच्या काळात काश्मीरमधील परिस्थिती चिंताजनक झाली असून दररोज दगडफेकीच्या घटना घडत आहेत, पाकिस्तानचे झेंडे फडकवले जात आहेत. 90 च्या दशकात जेव्हा काश्मीरमध्ये मोठ्या प्रमाणात दहशतवादी कारवाया सुरु होत्या तेव्हा झालेल्या निवडणुकीत 47 टक्के मतदान झाले होते.
काँग्रसने सत्ता सोडली तेव्हा काश्नमीरमध्ये मतदानाची टक्केवारी 65 इतकी होती. ती गेल्या तीन वर्षात ती 2 टक्क्यांवर आली आहे. नोटाबंदीनंतर दहशतवादी आणि नक्षली कारवाया बंद होतील असे मोदी म्हणाले होते मात्र नोटाबंदीनंतर कारवाया कमी झाल्या नाहीत तर उलट वाढल्या आहेत. निवडणूक प्रचारात दाऊदच्या मुसक्या आवळून त्याला भारतात आणू म्हणणा-या भाजपचे मंत्री आणि आमदार दाऊदच्या नातेवाईकाच्या लग्नात मेजवानीचा आस्वाद घेत आहेत. भाजपचा दाऊदशी काय संबंध आहे तो त्यांनी स्पष्ट करावा असे सिंह म्हणाले.
सरकारविरोधात बोलणा-यांना देशद्रोही ठरवून बदनाम करून त्यांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न सरकारकडून सुरु आहे. पत्रकार, सामाजिक संस्थांवर खोटे गुन्हे दाखल केले जात आहेत. मध्यप्रदेशातील व्यापम घोटाळ्या प्रकरणी सीबीआयने धाडी टाकल्या नाहीत मात्र सरकारविरोधात बोलणा-या नेत्यांच्या घरांवर सीबीआय, ईडी, इन्कम टॅक्सच्या धाडी टाकून त्यांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न सुरु आहे. मोदी सरकार भ्रष्टाचाराला संरक्षण देत असून सहारा डायरी आणि गुजरात गॅस घोटाळ्याची चौकशी का करत नाही? असा सवाल त्यांनी सरकारला केला.
भाजप सरकारच्या काळात महिलांवरील अत्याचारात मोठ्या प्रमाणात वाढ झाली असून भाजपशासीत राज्यांमध्ये महिलांवर सगळ्यात जास्त अत्याचार होत आहेत. या सरकारच्या काळात महिला, दलित, अल्पसंख्यांक, आदिवासी कोणीही सुरक्षित नाही. देशात झुंडशाही आली असून जमावाकडून निष्पाप लोकांच्या हत्या सुरु आहेत. सरकारच्या मुकसंमतीने हे सुरु आहे असे सिंह म्हणाले.
या पत्रकार परिषदेला महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष खा. अशोक चव्हाण मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष संजय निरूपम महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस आणि प्रवक्ते सचिन सावंत, प्रवक्ते डॉ. राजू वाघमारे, मुंबई काँग्रेसचे उपाध्यक्ष चरणजित सिंग सप्रा उपस्थित होते.