नवी दिल्ली : काँग्रेस नेते खासदार राहुल गांधी यांनी लोकसभेत मणिपूर हिंसाचारावरून मोदी सरकारला चांगलेच धारेवर धरले. मणिपूरच्या मुद्द्यावरून विरोधी पक्षांनी नरेंद्र मोदी सरकारविरोधात अविश्वास प्रस्ताव आणला आहे. या प्रस्तावावर सध्या सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप -प्रत्यारोपाच्या फैऱ्या सुरु आहेत.
गुरुवारी १० ऑगस्ट रोजी त्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी उत्तर देणार असल्याचं सांगितलं जात आहे. या पार्श्वभूमीवर आज राहुल गांधींनी केलेल्या भाषणात मोदी सरकारवर हल्लाबोल केला. मोदी सरकारने मणिपूरमध्ये हिंदुस्थानची हत्या केली, असे विधान गांधी यांनी केले. या विधानानंतर सभागृहात गदारोळ पाहायला मिळाला.
मणिपूरमध्ये इतका मोठा हिंसाचार घडला. मात्र आमचे पंतप्रधान आजपर्यंत गेले नाहीत. कारण त्यांच्यासाठी मणिपूर हिंदुस्थान नाही. मी मणिपूर शब्दाचा वापर केला. पण आज मणिपूर वाचलेलं नाही. मणिपूरला तुम्ही दोन भागांमध्ये वाटले. मी मणिपूरच्या रिलीफ कॅम्पमध्ये गेलो. त्याठिकाणी वास्तव्यास असलेल्या महिला आणि मुलांशी चर्चा केली. मात्र पंतप्रधान मोदींनी तसे काहीच केले नाही.
राहुल गांधींच्या या विधानावर सत्ताधारी बाकांवरून “हे खोटे आहे”,असे म्हणाले. यावर उत्तर देतांना राहुल गांधी म्हणाले की, मी खोटं बोलत नाही, तुम्ही खोटं बोलता. यानंतर सभागृहात विरोधक आणि सत्ताधाऱ्यांमध्ये मोठा वाद रंगल्याचे पाहायला मिळाले.