नवी दिल्ली : देशभरातील मुस्लिम बांधवांमध्ये रमजान ईदचा उत्साह सुरु आहे. यापार्श्वभूमीवर मोदी सरकारने 32 लाख मुस्लिम बांधवांना ईदनिमित्ताने ईदी भेटवस्तू देण्याचा निर्णय घेतला आहे. ‘सौगात ए मोदी’ नावाने भाजपच्या अल्पसंख्यांक विभागाकडून 32 लाख मुस्लिम बांधवांना हे कीट देण्यात येणार आहेत.
या कीटसंदर्भात बोलताना भाजपचे महासचिव दुष्यंत गौतम यांनी म्हटले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी नवरात्रीनिमित्ताने हिंदू बांधवांना तर बडे दिननिमित्त ईसाई बांधवांना भेटवस्तू देतात. त्यामुळे, आता ईदनिमित्त मुस्लिम बांधवांना ही भेट दिली जात असून मोदींवर सर्वच मुस्लिम बांधव प्रेम करतात, असेही गौतम यांनी म्हटले.
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सूचनेनुसार राजधानी दिल्लीतील निझामुद्दीन येथून मंगळवारी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांच्या उपस्थितीत सौगात ए मोदी या कीटचे वाटप करण्यास सुरूवात होणार आहे. देशभरातली 32 लाख गरीब मुस्लिम बांधवांना सौगात ए मोदी कीट भेट स्वरुपात देण्यात येणार आहे. भाजपच्या अल्पसंख्याने विभागाने याबाबत आनंद व्यक्त केला आहे.
सौगात ए मोदी कीट मध्ये नेमके काय?
भाजपकडून देण्यात येणाऱ्या सौगात ए मोदी कीटमध्ये नेमकं काय असणार आहे. तर, या कीटमध्ये नवीन कपडे, शेवया, खजूर, काजू-बदाम आणि साखर असणार आहे. तर, महिलांना देण्यात येणाऱ्या कीटमध्ये सूटचे कापड असणार असून पुरुषांच्या कीटमध्ये कुर्ता-पायजमाचा कपडा असेल.