नागपूर: केंद्र सरकारने गुजरातमधील पांढऱ्या कांद्याच्या निर्यातीला परवानगी दिल्यानंतर महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांमध्ये यासंदर्भात असंतोष निर्माण झाला होता. राज्यातील निर्यातबंदीमुळे विरोधकांनी सरकारला चांगलेच घेरले होते. राज्यातील शेतकऱ्यांचा रोष बघता अखेर केंद्र सरकारने कांदा निर्यातीवरील बंदी उठवण्याचा निर्णय घेतला. यावरूनच आता ठाकरे गटाने मोदी सरकारवर हल्लाबोल केला.
महाराष्ट्राची कांदा निर्यातबंदी हटवून तुम्ही येथील शेतकऱ्यांना ‘गिफ्ट’ वगैरे काही दिले नाही तर तुम्हाला महाराष्ट्राच्या संतापापुढे शेपूट घालावे लागले आहे, अशी टीका शिवसेनेच्या ठाकरे गटाचे मुखपत्र असलेल्या ‘सामना’तून मोदी सरकारवर करण्यात आली आहे. केंद्र सरकारच्या मनात महाराष्ट्राविषयी असलेला द्वेष मागील दहा वर्षांत अनेकदा दिसून आल्याने ठाकरे गटाचे म्हणणे आहे.
मोदी सरकारच्या गुजरातप्रेमाची आणि महाराष्ट्रद्वेषाची यादी न संपणारी आहे. त्यात महाराष्ट्रातील गरीब कांदा उत्पादक शेतकऱ्यांचीही भर पडली होती. मात्र महाराष्ट्राची निर्यातबंदी तशीच ठेवून गुजरातच्या दोन हजार मेट्रिक टन पांढऱ्या कांद्याची निर्यात मोदी सरकारविरोधात ठिणगी ठरली. या ठिणगीने महाराष्ट्रात सत्तापक्षाविरोधात वणवा पेटला असता. त्यात त्या पक्षाचे लोकसभा निवडणुकीतील भवितव्य जळून खाक झाले असते. त्यामुळेच घाईघाईने महाराष्ट्रातील कांदादेखील निर्यातीसाठी खुला केल्याची मखलाशी केली गेली. महाराष्ट्राची कांदा निर्यातबंदी हटवून तुम्ही येथील शेतकऱ्याला ‘गिफ्ट’ वगैरे काही दिलेले नाही. तर तुम्हाला महाराष्ट्राच्या संतापापुढे शेपूट घालावे लागले आहे महाराष्ट्राची कांदा निर्यातबंदी उठविणे केंद्र सरकारला भाग पडले असून सत्तापक्ष स्वतःच स्वतःची पाठ थोपटून घेत आहे.
मोदी यांनी महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना ‘गिफ्ट’ दिले, अशा पिपाण्या वाजवीत आहे. मात्र, हे गिफ्ट वगैरे काही नाही. महाराष्ट्रातील जनक्षोभासमोर मोदी सरकारने घातलेली शेपूट आहे. मोदी सरकारला खरोखरच महाराष्ट्रातील कांदा उत्पादकांना ‘गिफ्ट’ द्यायचे होते, तर त्यांनी आधी फक्त गुजरातमधील पांढऱ्या कांद्यालाच निर्यातीची परवानगी का दिली? महाराष्ट्र आणि गुजरात असा वेगवेगळा न्याय का लावला? महाराष्ट्रावर विनाकारण लादलेली कांदा निर्यातबंदीदेखील गुजरातसोबतच का नाही उठवली?असा प्रश्नांची सरबत्ती ठाकरे गटाकडून करण्यात आली आहे.