नवी दिल्ली / मुंबई – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उत्तराधिकारी कोण असतील, यासंदर्भात राजकीय चर्चांना ऊत आला असताना, भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी यावर ठाम भूमिका मांडली आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 2029 पर्यंत नरेंद्र मोदींचंच नेतृत्व असेल, असे स्पष्ट करत ‘उत्तराधिकारी’ संदर्भातील चर्चा निरर्थक असल्याचं म्हटलं आहे.
मोदींच्या नेतृत्वाबाबत अजिबात संभ्रम नाही – फडणवीस
मुंबईतील एका व्यासपीठावर बोलताना फडणवीस म्हणाले, “मोदींचं नेतृत्व आजही देशासाठी अत्यावश्यक आहे. 2029 मध्येही तेच पंतप्रधान असतील, असं आम्हाला वाटतं. त्यामुळे सध्या उत्तराधिकारी कोण, यावर चर्चा करणेच योग्य नाही.
त्यांनी पुढे स्पष्ट केलं की, “भाजपमध्ये व्यक्तीपेक्षा संस्था मोठी असते आणि निर्णय सामूहिक असतो. मोदींच्या नंतर कोण, हा निर्णय वेळ आल्यावर पक्ष आणि संघ मिळून घेतील.”
अजून १० वर्ष तरी वाट पाहा- शहांचा टोला
दरम्यान, दिल्लीतील एका पत्रकार परिषदेत अमित शहा यांनीही या विषयावर स्पष्ट भूमिका मांडली. “अजून १० वर्ष तरी पंतप्रधान मोदीच देशाचं नेतृत्व करणार आहेत. विरोधकांना काही काम उरलेलं नाही, म्हणून त्यांनी उत्तराधिकारीचं गाणं सुरू केलं आहे,” असा टोला शहा यांनी लगावला.
राऊतांच्या टोमण्यांवर भाजपचे प्रतिउत्तर-
शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी काही दिवसांपूर्वी फडणवीस पंतप्रधान होतील, असं सूचित केले होते. यावर भाजपकडून आता ठाम आणि स्पष्ट प्रतिउत्तर देण्यात आलं आहे. देशात नेतृत्व बदलण्याची गरज नाही, मोदी आहेत आणि राहतील, असे भाजपकडून स्पष्ट करण्यात आले.