मुंबई : भाजपाने जाहीर केलेल्या लोकसभेच्या पहिल्या यादीत कृपाशंकर सिंह यांचे नाव समाविष्ट केले. तर नितीन गडकरींना डावलले यावरून विरोधकांनी भाजपवर ताशेरे ओढले. उबाठा गटाचे नेते माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पुसद येथील सभेत याच मुद्द्यावरून भाजपवर हल्लाबोल केला.
महाराष्ट्रात भाजपाची ओळख करून देण्यात प्रमोद महाजन, गोपीनाथ मुंडे आणि नितीन गडकरी यांच्यासारख्या नेत्यांचा महत्त्वाचा वाटा होता.त्यामुळे गडकरींना मोदींसमोर झुकण्याची गरज नाही. तुमचं नशीब मोदींच्या हातात नसून तुमच्या हातात मोदींचं नशीब आहे, असे विधान उद्धव ठाकरे यांनी केले.
भ्रष्टाचाराने बरबटलेला व्यक्ती, असा आरोप भाजपानेच कृपाशंकर सिंह यांच्यावर केला होता. त्या कृपाशंकर यांचे नाव पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह पहिल्या यादीत आहे. पण गडकरींचं नाव नाही. गडकरींना दोन दिवसांपूर्वी आवाहन केले होते. तेच पुन्हा एकदा करेन. तुमचा भाजपामध्ये अपमान होत असेल तर लाथ मारा भाजपाला आणि महाविकास आघाडीत या. आम्ही तुम्हाला जिंकून आणतो, असे आवाहन उबाठा गटाचे नेते उद्धव ठाकरे यांनी केले आहे.
आगामी लोकसभा निवडणूक आमचेच सरकार येणार आहे. त्या सरकारमध्ये आम्ही तुम्हाला मंत्रीपद देऊ, असेही उद्धव ठाकरे यांनी सांगितले. आताच्या सरकारमध्ये तुम्हाला केवळ मंत्रिपदाची खूर्ची दिली गेली होती. तर आमच्या सरकारमध्ये तुम्हाला अधिकारासह मंत्रिपदाची खूर्ची देतो. पण तुम्ही महाराष्ट्राचे पाणी काय असते ते दाखवून द्या, असेही ठाकरेंनी म्हटले आहे.
भ्रष्टाचाराच्या कारवाईपासून वाचविण्यासाठी मोदी गॅरंटी –
पुसदच्या सभेत उद्धव ठाकरेंनी वाशिम-यवतमाळच्या खासदार भावना गवळी आणि मंत्री संजय राठोड यांच्यावरही जोरदार टीका केली. इथल्या खासदारावर भाजपाने भ्रष्टाचाराने आरोप केले होते. मग त्यानंतर विकासासाठी खासदार महिला भाजपामध्ये गेल्या आणि त्यांनी भाजपच्या वरिष्ठ नेत्यांना राखी बांधली. भ्रष्टाचाराच्या कारवाईपासून वाचविण्यासाठी मोदी गॅरंटी दिली गेली, अशी टीका उद्धव ठाकरेंनी दिली.