नागपूर : काही दिवसांपूर्वी नागपुरातील मोमीनपुरा परीसरात एका मद्यधुंद कारचालकाने चेकिंगदरम्यान दोन पोलिस कर्मचाऱ्यांना कारने उडविण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, एका गल्लीत कार अडकल्याने लोकांनी कारमधील दोघांना पकडून बेदम मारहाण करून पोलिसांच्या ताब्यात दिले. मात्र, यादरम्यान
कारमधून तिसऱ्या व्यक्तीने पळ काढला. हा तिसरा व्यक्ती कारमधील दोघांना गांजा व इतर अंमली पदार्थ पुरविण्याचे काम करत होता.
मोमीनपुरा येथील भगवा घर चौकात 15 नोव्हेंबरच्या रात्री पोलीस येणाऱ्या जाणाऱ्या वाहनांची तपासणी करत होते. यावेळी भरधाव वेगाने येणाऱ्या कारने बॅरिकेड तोडून पळ काढला. या गाडीच्या चालकाने दोन पोलीस कर्मचाऱ्यांना चिरडण्याचा प्रयत्न केला होता. या घटनेत पोलीस कर्मचारी अनिरुद्ध सहस्त्रबुद्दे आणि संजय तिवारी गंभीर जखमी झाले आहेत. नंतर कार रेहमान हॉटेलच्या अरुंद गल्लीत अडकली मात्र तोपर्यंत कारने अनेक दुचाकींचे नुकसान केले होते. कारमधून पळून जाण्याच्या प्रयत्नात संकेत कान्हेरे आणि राहुल राऊत या दोन आरोपींना उपस्थित जमावाने पकडले आणि नंतर पोलिसांच्या ताब्यात दिले.
तपासादरम्यान या कारमध्ये गांजा व इतर अंमली पदार्थ आढळून आले. हा गांजा मानकापूर येथील सोहेल खान नावाच्या गांजा तस्कराने पुरवला होता, जो अपघाताच्या वेळी कारमध्ये उपस्थित होता आणि संधी मिळताच त्याने तेथून पळ काढला. काल रात्री तहसील पोलिसांना सोहेल त्याच्या घरी आल्याची माहिती मिळाली होती, त्यानुसार पोलिसांनी त्याच्या घरावर छापा टाकून त्याला अटक केली.